सलमान खान दिसणार वडिलाच्या भूमिकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2017 03:34 PM2017-01-01T15:34:29+5:302017-01-01T15:34:29+5:30
बॉलिवूडचा दंबग सलमान खान याने चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, आता तो आमिर खानच्या पावलावर पाऊल ठेवत वडिलांची ...
२०१६ साली प्रदर्शित झालेला सलमान खानचा सुल्तान हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. सुल्तानमधील त्याच्या अभिनयाची प्रशंसा झाली. आता लवकरच सलमान पडद्यावर बापाची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे वृत्त एका वर्तमानपत्राने दिले आहे. आपल्या या भूमिकेविषयी सलमान म्हणाला, काही वर्षांपूर्वी ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटात मी वडिलाची भूमिका साकारली होती, तेव्हा मी ३० वर्षांचा होतो. आता मी पुन्हा एकादा बापाची भूमिका करणार आहे. चित्रपटात माझी मुलगी १३ वर्षांची आहे. हा चित्रपट डान्सवर आधारित आहे, तुम्ही याची तुलना हॉलिवूडपट ‘स्टेप अप’ याच्याशी करू शकता. यासाठी मी डान्सचे प्रशिक्षण घेत आहे.
‘सुल्तान’साठी मला वजन वाढवावे लागले होते. आता मी १८ किलो वजन कमी केले आहे. हे माझ्यासाठी खूपच त्रासदायक होते. यासाठी मला डायटिंग करावी लागली होती. डायटिंग व वजन कमी करणे हे पृथ्वीवरील सर्वांत कठीण काम आहे असे मला वाटू लागले आहे. पण पडद्यावर भूमिका साकारण्यासाठी तुम्हाला हे करावे लागणार आहे. वाँटेड किंवा सुल्तानमधील भूमिकांना पाहून वयानुसार भूमिका साकाराव्या असे मला म्हणू नका. मी केवळ ५१ वर्षांचा आहे. सिल्वेस्टर स्टलोन ७० व्या वर्षी रॅम्बो व रॉकीमध्ये काम करीत आहे. चित्रपटांची दुनिया खूप सुंदर आहे. येथे आपण स्वप्नांना विकतो मग मी तसे का करू नये, असेही सलमान म्हणाला.
सलमानने आपल्या आगामी चित्रपटाची माहिती दिली हे खरे असेल तरी तो आगामी चित्रपटातून नव्या अवतारात पहायला मिळेल हे तेवढेच खरे.