'सिकंदर'साठी सलमान खानचं मानधन बजेटच्या जवळपास अर्ध! रश्मिकाला 'इतके' कोटी मिळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 10:22 IST2025-04-03T10:00:38+5:302025-04-03T10:22:54+5:30
'सिकंदर'मध्ये काम करण्यासाठी सलमाननं किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात सलमानच्या मानधनाबाबत...

'सिकंदर'साठी सलमान खानचं मानधन बजेटच्या जवळपास अर्ध! रश्मिकाला 'इतके' कोटी मिळाले
बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानने (Salman Khan) 'सिकंदर' (Sikandar) सिनेमातून बॉक्स ऑफिसवर दीड वर्षांनी पुनरागमन केलं आहे. त्यामुळे 'बजरंगी भाईजान', 'सुलतान' या सिनेमांप्रमाणे 'सिकंदर' पाहण्यासाठी सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, ईदचा प्रभाव संपताच 'सिकंदर' डळमळीत होऊ लागला आहे. आतापर्यंत म्हणजे प्रदर्शित झाल्यापासून गेल्या ४ दिवसांमध्ये 'सिकंदर'ने ८४.२५ कोटींचा गल्ला (Sikandar Collection) जमावल्याची माहिती आहे. सिनेमाला अद्याप आपलं मूळ बजेट अर्धही वसूल करता आलेलं नाही. 'सिकंदर'चं मूळ बजेट २०० कोटी आहे. खरं तर सलमानचं मानधनचं सर्वांत जास्त आहे.
सलमान खान हा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, जो त्याच्या मानधनामध्ये कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाही आणि हे 'सिकंदर'मुळं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित या अॅक्शन ड्रामा चित्रपटासाठी सलमानने तगडी रक्कम घेतली आहे. तर सलमानच्या तुलनेत त्याची सहकलाकार रश्मिका मंदान्नाला (Rashmika Mandanna) निम्मीही फी मिळालेली नाही.
सलमान खान चित्रपटांसाठी सुमारे ५० ते १०० कोटी रुपये घेतो. रिपोर्ट्सनुसार, त्याने २०२३ च्या ईदला प्रदर्शित झालेल्या 'किसी का भाई किसी की जान'साठी १२५ कोटी रुपये घेतले होते. तर यशराज बॅनरखाली बनवलेल्या दिवाळीत प्रदर्शित झालेल्या 'टायगर-३'साठी त्याने १०० कोटी रुपये घेतले होते. आता सिकंदरसाठीही सलमान खानने निर्मात्यांचे खिसे मोकळे केले. फिल्मी बीटनुसार, 'सिकंदर' चित्रपटाचं बजेट सुमारे २०० कोटी आहे आणि एकट्या सलमान खानने या चित्रपटासाठी १२० कोटींची मोठी फी आकारली आहे.
दुसरीकडे 'छावा' आणि 'पुष्पा २' च्या यशाचा फायदा रश्मिका मंदानाला झालेला नाही. आलिया भट असो वा दीपिका पदुकोण असो किंवा देसी गर्ल प्रियांका चोप्रा, बॉलिवूडमध्ये जेव्हा एखाद्या अभिनेत्रीचा चित्रपट सलग सुपरहिट होतो, तेव्हा तिच्या मानधनातही मोठी वाढ होते. पण, रश्मिका मंदान्नाच्या बाबतीत असं घडलेलं दिसत नाही. 'पुष्पा'च्या पहिल्या भागासाठी २ कोटी रुपये मानधन घेणाऱ्या रश्मिकाने 'पुष्पा २' साठी १० कोटी रुपये घेतले होते. तर 'छावा'साठी तिने तिचं मानधन कमी केलं आणि फक्त ४ कोटी रुपये घेतले होते. सलग दोन हिट चित्रपट दिल्यानंतरही रश्मिका मंदानाच्या मानधनात फारसा फरक पडलेला नाही. कारण रिपोर्ट्सनुसार, तिने 'सिकंदर'साठी फक्त ५ कोटी रुपये घेतले आहेत.