तेरे नाम...!! FB प्रोफाईल फोटोतून सलमानचा 'खाकी'ला सलाम, चाहते म्हणाले 'असली भाईजान'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 02:48 PM2020-05-10T14:48:17+5:302020-05-10T15:17:36+5:30
डीपी बदलत त्याठिकाणी लावला महाराष्ट्र पोलिसांचा लोगो...
देशभर कोरोनाचे संकट गडद होत असताना आणि अख्खा देश लॉकडाऊन असताना पोलिस,आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी मात्र रस्त्यावर आहेत. कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी लढत आहेत. या कोरोना वॉरियर्सच्या सन्मानार्थ देशातील प्रत्येक नागरिकाने सोशल अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवावा, असे आवाहन महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केले होते. त्यांच्या या आवाहन प्रतिसाद देत बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने आपला डीपी बदलत त्याठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावला आहे.
आज सकाळी भाईजानच्या सर्व सोशल अकाऊंटवरचे प्रोफाईल बदललेले दिसले. त्याच्या फेसबुक, ट्विटर प्रोफाईलवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो पाहून चाहतेही सुखावले. यासाठी अनेकांनी भाईजानचे कौतुक केले.
कोरोना व्हायरसविरोधातील या लढ्यात सलमान गरजूंना मदत करताना दिसतोय.
अनिल देशमुख यांनी केले होते आवाहन
सदैव देशसेवेस कर्तव्यतत्पर असणारे पोलीस एकटे नाहीत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मी फेसबुक, ट्विटर व इन्स्टाच्या अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही आपला डीपी ठेवून पोलीस बांधवांच्या सन्मानात सहभागी व्हा. #पोलिसांनासाथ_कोरोनावरमातpic.twitter.com/bLx9psUXAD
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 9, 2020
‘सदैव देशसेवेस कर्तव्यतत्पर असणारे पोलीस एकटे नाहीत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मी फेसबुक, ट्विटर व इन्स्टाच्या अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही आपला डीपी ठेवून पोलीस बांधवांच्या सन्मानात सहभागी व्हा’, असे ट्विट अलीकडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनानंतर अनेकांनी आपला डीपी बदलत त्याठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावला होता.
सलमानने केली अनेकांची मदत
एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे लॉकडाऊन अशा कात्रीत अडकलेली अनेक कुटुंबे सध्या बिकट परिस्थितीतून जात आहेत. सुदैवाने या गरजवंतासाठी मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. सलमान खान याचे नाव या यादीत आवर्जुन घ्यावे लागेल. लॉकडाऊनमुळे पनवेलच्या फार्महाऊसवर अडकून पडलेला भाईजान अनेकांच्या मदतीला धावून आला आहे. इंडस्ट्रीतील गरजू कलाकारांच्या खात्यात रोख रक्कम जमा करण्यापासून तर आजुबाजूच्या खेड्यांतील गावक-यांच्या किराणा पुरवण्याचे कार्य त्याने चालवले आहे. नुकताच गरजूंसाठी त्याने फूड ट्रकही सुरु केला.