सलमान खानला तुरुंगातचं काढावी लागणार दुसरी रात्र! जामिनावर उद्या होणार निर्णय!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 05:57 AM2018-04-06T05:57:08+5:302018-04-06T11:38:07+5:30
काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या सलमान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मात्र आज तरी त्याला ...
आज सकाळी १०.३० वाजता सलमानच्या जामिनावर सुनावणी होणार म्हणून सर्वांचे लक्ष सत्र न्यायालयाच्या सुनावणीकडे लागले होते. आज सकाळी १०.१० वाजता सलमानच्या दोन्ही बहीणी अलविरा आणि अर्पिता या दोघी शिवाय बॉडीगार्ड शेरा जामिनावरील सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचले. यानंतर सलमानचे वकीलही न्यायालयात पोहोचले. १०.३० वाजता सत्र न्यायालयाने सलमानच्या जामिनावर सुनावणी सुरू केली. यावेळी सलमानच्या वकीलांनी सलमानला जामीन मंजूर करण्याची विनंती करत, ५१ पानांचा युक्तिवाद न्यायालयात सादर केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विश्वासार्ह नव्हते. परिस्थितीजन्य पुरावेही भक्कम नव्हते. शिवाय अन्य आरोपींप्रमाणे सलमानलाही संशयाचा लाभ मिळायला हवा, असे अनेक युक्तिवाद सलमानच्या वकीलांनी केले. सरकारी वकीलांनी हा युक्तिवाद खोडून काढला. सुमारे अर्धा तास चाललेल्या सुनावणीअंती न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. त्यामुळे सलमानच्या भवितव्याचा निर्णय उद्यावर गेला. न्यायालयाने निर्णय राखून ठेवल्याने आजची रात्रही सलमानला त्याच बराक क्रमांक २ मध्ये काढावी लागणार आहे.
ALSO READ : काय म्हणून बाकी आरोपी सुटलेत अन् सलमान खानला मिळाली शिक्षा?
१९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने काल गुरूवारी सलमानला दोषी ठरवत, पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती. यानंतर जोधपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात सलमानची रवानगी करण्यात आली होती. कालची अख्खी रात्र सलमानने तुरुंगात काढली. ‘हम साथ साथ है’च्या शूटींगदरम्यान सलमान खान आणि इतर आरोपी घोडा फार्म हाऊस येथे थांबले होते. यादरम्यान भवाद गावात २७व२८ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. यानंतर १ आॅक्टोबर रोजी कांकणी गावात काळवीटांची शिकार केल्याचाही आरोप आहे. काळवीट शिकार प्रकरणात सलमानविरोधात एकूण चार गुन्हे (कांकाणी प्रकरण, घोडा फार्म हाऊस प्रकरण, भवाद प्रकरण, आर्म्स अॅक्ट प्रकरण)दाखल झाले होते. यापैकी तीन खटले काळवीट शिकारीचे होते तर चौथा आर्म्स अॅक्टचा होता. काल सलमानला शिक्षा ठोठावण्यात आली,ते प्रकरण कांकाणी गावातील आहे.