मालदीवसोबतच्या वादामुळे सलमान खान-करण जोहरचा 'द बुल' पडला मागे? वाचा नेमकं प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 05:01 PM2024-01-23T17:01:23+5:302024-01-23T17:03:17+5:30
भारत आणि मालदीवमध्ये सुरु असलेल्या वादामुळे सिनेमा पुढे ढकलण्यात आला आहे.
बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानने (Salman Khan) गेल्या वर्षी 'टायगर 3' आणि 'किसी का भाई किसी की जान' हे दोन सुपरहिट चित्रपट दिले. आता त्याच्या आगामी 'द बुल' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमासाठीसलमान खानने करण जोहरसोबत (Karan Johar) हात मिळवला आहे. 'कुछ कुछ होता है' नंतर थेट दोघंही या सिनेमासाठी एकत्र येत आहेत. पुढील महिन्यात सिनेमाचं काम सुरु होणार होतं. मात्र मालदीवसोबत सुरु असलेल्या वादामुळे काम पुढे ढकललं गेलं आहे.
माध्यम रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि दिग्दर्शक विष्णु यांनी सिनेमासाठी आणखी थोडा वेळ घेण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमाच्या स्क्रीनप्लेपासून ते स्क्रीप्टपर्यंत सर्वच गोष्टींवर पुन्हा एकदा काम करण्यात येईल. तोपर्यंत सिनेमाचं पुढे ढकलण्यात आला आहे. भारत आणि मालदीवमध्ये सुरु असलेल्या वादामुळे सिनेमाला उशीर होत आहे. फेब्रुवारीमध्ये सुरु होणाऱ्या सिनेमाला आता आणखी दोन महिने पुढे ढकलण्यात आलं आहे. याआधी 28 डिसेंबर 2023 रोजी फिल्मची पूर्ण टीम फिल्मसिटी येथे एकत्रित आली होती. यानंतर फेब्रुवारीमध्ये फिल्म फ्लोरवर असं ठरलं होतं.
मालदीवला दहशतवादी हल्ल्यापासून वाचवण्यासाठी भारतीय सेनेकडून करण्यात आलेले फेमस ऑपरेशन 'कॅक्टस'वर 'द बुल' हा सिनेमा आधारित आहे. यामध्ये सलमान खान फारुक बुल्सरा या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी त्याने वजन घटवण्यासही सुरुवात केली आहे. आर्मी ऑफिसरसारखा दिसण्यासाठी त्याने प्रॅक्टिस सुरु केली आहे. यासोबतच सलमान खान पहिल्यांदा साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विष्णुवर्धन यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा हा सिनेमा धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होत आहे.