एंटरटेनमेंट में नो पायरसी! ‘राधे’ पायरेटेड साईट्सवर बघाल तर खैर नाही!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 10:11 AM2021-05-16T10:11:41+5:302021-05-16T10:12:58+5:30
रिलीज झाल्यानंतर काहीच तासांत ‘राधे’ ऑनलाईन लीक झाला. अशात भाईजानचे टेन्शन वाढणे साहजिक आहे
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman khan) याचा ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe: Your Most Wanted Bhai) हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. मात्र रिलीज झाल्यानंतर काहीच तासांत सिनेमा ऑनलाईन लीक झाला. अशात भाईजानचे टेन्शन वाढणे साहजिक आहे. आता त्याने पायरेटेड साईट्सविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ लीक होताच अनेक चाहत्यांनी सलमान व मेकर्सला याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली होती. आता सलमानने एक स्टेटमेंट जारी केले आहे. यात त्याने पायरेटेड साईट्सविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
सलमान म्हणतो,
आम्ही ‘राधे’ पाहण्यासाठी 249 हा अतिशय सामान्य दर ठेवला आहे. असे असूनही पायरेटेड साईट्स ‘राधे’ बेकायदेशीरपणे स्ट्रिमिंग करत आहेत. हा एक गुन्हा आहे. सायबर सेल या सर्व अवैध पायरेटेड साईट्सविरोधात कारवाई करत आहेत. कृपा करून या पायरसीचा भाग बनू नका. अन्यथा सायबर सेल तुमच्याविरोधातही कारवाई करेन. कृपा करून लक्षात घ्या, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता, असे सलमानने त्याच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.
‘राधे’ रिलीज होण्याआधी 12 मे रोजी सलमानने पायरसीविरोधात विधान केले होते. एक सिनेमा बनवण्यासाठी अनेक लोक दिवसरात्र कष्ट घेतात. त्यांच्या कष्टातून सिनेमा तयार होतो. सिनेमा तयार झाल्यानंतर तो पाहण्यासाठी काही लोक पायरसीचा आधार घेतात, तेव्हा खूप वाईट वाटते. मी सर्वांना विनंती करू इच्छितो की, योग्य प्लॅटफॉर्मवरच सिनेमा बघा. एंटरटेनमेंट में नो पायरसी़़, असे तो म्हणाला होता.
‘राधे’ हा सिनेमा प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेला आहे. यात सलमानसोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. समीक्षकांनी या सिनेमावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण सलमानच्या चाहत्यांच्या मात्र ‘राधे’वर उड्या पडत आहेत.