‘सिकंदर’च्या मनातच उभारली ‘निर्भया’ने गुढी ! ‘बजरंगी भाईजान’ने दिले दीड लाखाचे गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 09:32 IST2025-03-30T09:32:07+5:302025-03-30T09:32:32+5:30
Salman Khan: धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील दहा वर्षीय निर्भयाची तब्बल चार हजार बालकलावंतांमधून निवड झाली. बहुचर्चित ‘सिकंदर’ चित्रपटामध्ये निर्भया ३० दिवसांच्या प्रवासात सलमान खानचे मन जिंकून बसली. म्हणून, ‘बजरंगी भाईजान’ने निर्भयाला मुंबईतील मॉलमध्ये नेऊन दीड लाखाचे गिफ्ट देत तिच्या अभिनयाला दाद दिली.

‘सिकंदर’च्या मनातच उभारली ‘निर्भया’ने गुढी ! ‘बजरंगी भाईजान’ने दिले दीड लाखाचे गिफ्ट
- कुंदन पाटील
जळगाव - धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील दहा वर्षीय निर्भयाची तब्बल चार हजार बालकलावंतांमधून निवड झाली. बहुचर्चित ‘सिकंदर’ चित्रपटामध्ये निर्भया ३० दिवसांच्या प्रवासात सलमान खानचे मन जिंकून बसली. म्हणून, ‘बजरंगी भाईजान’ने निर्भयाला मुंबईतील मॉलमध्ये नेऊन दीड लाखाचे गिफ्ट देत तिच्या अभिनयाला दाद दिली.
चौथ्या वर्गात शिकत असलेली निर्भयाचे वडील लीलाधर पाटील हे मुंबईत पोलिसांत अधिकारी. तेही गुन्हेगारी जगताशी संबंधित मालिकांमध्ये अभिनय करतात. निर्भयाची अभिनयातील आवड लक्षात घेत तिला ऑडिशनला नेले. झोपडपट्टीवर आधारित ‘सिकंदर’ चित्रपटासाठी पाच बालकलाकारांची निवड करायचे ठरले. चार हजार बालकलाकार अभिनयाच्या चाचणीला सामोरे गेले. चार मुलांसोबतच एकट्या निर्भयालाही ‘सिकंदर’ पावला. गोरेगाव परिसरात ३० दिवसांच्या चित्रीकरणात सलमान खान निर्भयाच्या अभिनयाच्या प्रेमात पडले आणि ३० दिवसांच्या चित्रीकरणात निर्भया कुशीत घेऊनच ‘सिकंदर’चे चित्रीकरण पूर्ण केले. रमजान ईदच्यादिवशी ‘सिकंदर’ देशभरात प्रदर्शित होणार आहे.
सल्लूचाचू दिसायला आक्रमक; पण खूप भावुक मनाचे. संपूर्ण चित्रीकरणादरम्यान त्यांनी निखळ प्रेम दिले. हा अनुभव अविस्मरणीय आहे. त्यांनी दिलेले ‘गिफ्ट’ मी जपून ठेवले आहे. - निर्भया पाटील, बालकलाकार
‘गुडिया’ चल मेरे साथ...
चित्रीकरण लवकर आटोपले, म्हणून सलमानने निर्भयाला हाक दिली. ‘गुडिया, चल मेरे साथ’ म्हणत निर्भयासह अन्य चौघा बालकलाकारांना सोबत घेत मुंबईतील एका मॉलमध्ये नेले आणि प्रत्येकाला दीड लाखाची खरेदी करून दिली, तेव्हा निर्भयाही भावूक झाली.
‘फुले’मध्ये ‘मुक्ता’
महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संघर्षमय वाटचालीवर आधारित ‘फुले’ चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातही निर्भयाने ‘मुक्ता’ची भूमिका साकारली आहे.