बिग बी, अक्षय कुमार नंतर आता मुंबई मेट्रोला मिळाली सलमान खानची साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 18:09 IST2019-09-20T18:08:40+5:302019-09-20T18:09:01+5:30
सलमान खानचा आगामी रिएलिटी शो बिग बॉसची पत्रकार परिषद मेट्रो कॉर्पोरेशनच्या यार्डमध्ये ठेवण्यात आली आहे.

बिग बी, अक्षय कुमार नंतर आता मुंबई मेट्रोला मिळाली सलमान खानची साथ
मुंबईला सिनेसृष्टीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे इथल्या कोणत्याही मुद्द्यावर लोक कलाकारांची मतं जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. मुंबईतील एक मुद्दा सध्या महत्त्वाचा बनला आहे तो म्हणजे मुंबई मेट्रो आणि आरे जंगल. बृहन्मुंबई नगर महापालिकेनं मुंबई मेट्रो कामासाठी आरे जंगलातील जवळपास २७०० झाडे कापण्याचे आदेश दिले आहेत. आता या मुद्द्यावर बॉलिवूडमध्ये दोन गट पडल्याचं पहायला मिळतंय.
काहींनी आरे वाचवण्यासाठी आंदोलने केली तर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार व आता सलमान खान मुंबई मेट्रोला सपोर्ट करताना दिसला. सलमान खानचा आगामी रिएलिटी शो बिग बॉसची पत्रकार परिषद मेट्रो कॉर्पोरेशनच्या यार्डमध्ये ठेवण्यात आली आहे.
बिग बॉसचा आगामी सीझन लवकरच भेटीला येणार आहे. या सीझनच्या संदर्भातील पत्रकार परिषद २३ सप्टेंबरला मुंबईतील डीएन नगर मेट्रो कॉर्पोरेशन यार्डमध्ये ठेवण्यात आली आहे. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार या निमित्ताने सलमान खान स्वतः सेलिब्रेटी एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवणार आहे. वाहिनीकडून नऊ सेंकदाचा एक व्हि़डिओ शेअर केला आहे. ज्यात बिग बॉस व सलमान खान मुंबई मेट्रोशी जोडलेलं पाहायला मिळत आहेत. असं बोललं जातंय की या मुद्द्यावर मुंबई मेट्रोचं समर्थन करण्यासाठी बिग बॉसची पत्रकार परीषद ठेवण्यात आली आहे.
नुकतेच अक्षय कुमारने मेट्रोनं प्रवास करत मेट्रोमुळे वेळेची बचत होते असं सांगत मेट्रोला पाठींबा दर्शवला होता.
तर अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोच्या समर्थनात एक ट्विट केलं होतं. ज्यानंतर काही लोकांनी त्यांना विरोध करायला सुरूवात केली. त्यांच्या घराबाहेर आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला.