आपण भारतात राहतो; OTT वरची नग्नता, अश्लीलता, शिव्या थांबल्या पाहिजेत; 'दबंग' सलमान रोखठोक बोलला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 11:32 AM2023-04-07T11:32:37+5:302023-04-07T11:36:51+5:30
Salman Khan on censorship on OTT : ओटीटीवरचा बोल्ड कन्टेन्ट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. आता या मुद्यावर भाईजान सलमान खानने त्याचं मत मांडलंय.
Salman Khan on censorship on OTT : ओटीटीवरचा बोल्ड कन्टेन्ट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. आता या मुद्यावर भाईजान सलमान खानने त्याचं मत मांडलंय. अनेक वेब सीरिज किंवा ओटीटीवरील चित्रपटांमध्ये सर्रास बोल्ड सीन्स किंवा शिव्या पाहायला मिळतात. अनेकदा आपण ओटीटीवरचे सिनेमे, सीरिज कुटुंबीयांसोबत बसून पाहू शकत नाही. सलमान याच विरोधात बोलला. ओटीटीवर सेन्सॉरशिप असलीच पाहिजे आणि ओटीटीवरची नग्नता, अश्लीलता, शिव्या थांबल्याच पाहिजेत, असं रोखठोक भाष्य भाईजानने केलं. यंदाच्या ‘फिल्मफेअर २०२३’ या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत सलमानने अनेक गोष्टींवर त्याचं स्पष्ट मत मांडलं.
काय म्हणाला सलमान?
ओटीटीवर सेन्सॉरशिप असायला हवं, असं मला खरोखरंच वाटतं. ओटीटीवरची अश्लीलता, नग्नता, शिवीगाळ हे सगळं थांबायला हवं, असं माझं स्पष्ट मत आहे. १५-१६ वर्षांची मुलंही हे सगळं बघत आहेत. अभ्यासाच्या नावावर तुमच्या लहान मुलीने मोबाईलवर हे सगळं बघितलं तर ते तुम्हाला कसं वाटेल? माझ्या मते, यासाठी सेन्सॉरशिप असली पाहिजे. ओटीटीवर येणारी प्रत्येक गोष्ट तपासली गेलीच पाहिजे. कंटेंट जेवढा स्वच्छ असेल तेवढाच तो लोकांना आवडेल, याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. असं सलमान यावेळी म्हणाला. ओटीटीवरच्या कलाकारांनाही त्याने अप्रत्यक्ष सुनावलं. तुम्ही सगळं काही केलं. लव्ह मेकिंग सीन्स, किसींग, जितकं एक्सपोज करायचं तितकं केलं. पण जेव्हा तुम्ही तुमच्या इमारतीत जाता, तेव्हा तुमचा वॉचमॅन तुमचं हे काम पाहत असतो. हे सर्व मला तरी ठीक वाटत नाही. आपल्याला हे सर्व करायची गरज नाही..., असं तो म्हणाला. काहीजण ‘टॅलेंटेड’ असतात, ते सगळं सहज करतात. पण जे यासाठी कम्फर्टेबल नसतात ते कलाकार ओटीटी रेसमध्ये मागे राहत आहेत. सिनेमा आणि टीव्हीसाठी सेन्सॉरशिप आहे तर ओटीटीसाठी का नसावी, असा सवालही त्याने केला.
i have been here since 1989 & i have never done this kind of stuff (vulgarity, nudity, swearing casually) so i think there should be censors on ott. it doesn't look good when 15 y/o kids watch this kind of stuff. television is still better than ott - #SalmanKhanpic.twitter.com/xip8CN61Ra
— simp (@jhonkahawaka) April 6, 2023
चित्रपटातील अंगप्रदर्शनाचं काय?
ओटीटीवरच्या बोल्ड कन्टेन्टबद्दल सलमान बोलला. पण चित्रपटातील बोल्ड सीन्स आणि अंगप्रदर्शनाचं काय? तर भाईजान त्यावरही बोलला. तो म्हणाला, मध्यंतरी चित्रपटातही असे प्रकार पाहायला मिळत होते, अर्थात आता प्रमाण थोडं कमी झालं आहे. आपण भारतात राहतो, आपल्या मर्यादा पाळायलाच हव्या. आता हळूहळू लोक चांगल्या कंटेंटकडे वळू लागले आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय.