बॉलिवूडमधील नेपोटिझमबाबत सलमान खानचे आहे हे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 05:53 PM2018-09-27T17:53:37+5:302018-09-28T08:00:00+5:30
आयुष शर्मा हा सलमान खानची बहीण अर्पिताचा नवरा असल्याने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. लव यात्री या चित्रपटाद्वारे सलमान त्याला लाँच करत आहे.
सलमान खानच्या बॅनर अंतर्गत तो त्याचा मेहुणा आयुष शर्माला लाँच करत आहे. आयुष हा सलमानची लाडकी बहीण अर्पिताचा नवरा आहे. लव यात्री असे आयुषच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात वरीना हुसेन ही नायिका आहे. वरीनाचा देखील हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमानने वांद्रे येथील त्याच्या निवास स्थानी नुकताच पत्रकारांसोबत संवाद साधला.
आयुष हा सलमानचा मेहुणा असल्याने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. आयुषला लाँच करण्याविषयी सलमान सांगतो की, आयुषला खूप वर्षांपूर्वी सोहेलने एका जीममध्ये पाहिले होते. त्यावेळीच तो एक चांगला अभिनेता होऊ शकतो असे सोहेलला वाटले होते. त्यामुळे मी नसतो तरी आयुषला कोणी ना कोणी तरी नक्कीच लाँच केले असते. त्याने त्याच्या लूक्सवर, नृत्यावर खूप मेहनत देखील घेतली आहे. तो तर एका राजकारण्याचा मुलगा आहे, त्यामुळे नेपोटिझमचा प्रश्न येतच नाही. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत की, ज्यांना आपल्या वडिलांमुळे, भावामुळे चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी मिळते. पण त्यांना या क्षेत्रात टिकता येत नाही. या क्षेत्रातील तुमचे भविष्य हे केवळ प्रेक्षकांवर अवलंबून असते. प्रेक्षकांना तुम्ही आवडलात तरच या इंडस्ट्रीत तुम्ही स्थिरावतात. एखादा कलाकार कोणाचा मुलगा आहे म्हणून त्याला कधीच प्रेक्षकांचे प्रेम मिळत नाही. मी तर एका संवाद लेखकाचा मुलगा आहे तसेच अजय देवगण हा अॅक्शन डायरेक्टरचा मुलगा आहे. पण तरीही आम्हाला प्रेक्षकांनी प्रेम दिल्यामुळेच आम्हाला यश मिळाले आहे.
सलमान खान प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या लव यात्री या सिनेमाचे दिग्दर्शन अभिराज मीनावालाने केले आहे. अभिराजची देखील दिग्दर्शन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला लव यात्री एक रोमॅन्टिक चित्रपट असून या चित्रपटात आयुष गरबा शिकवणाऱ्या मुलाची भूमिका साकारत आहे तर वरिना एक फॉरेनर असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. लव यात्री हा सिनेमा ५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव सुरुवातीला लव रात्री असे ठेवण्यात आले होते. पण या नावामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने या चित्रपटाचे नाव बदलून लव यात्री असे ठेवण्यात आले आहे.