बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 08:17 AM2024-10-13T08:17:40+5:302024-10-13T08:18:12+5:30
Baba Siddique Shooting latest news: सिद्दिकींना गोळी लागल्याचे समजताच हजारो कार्यकर्ते लिलावतीच्या इमर्जन्सी गेटसमोर जमा झाले होते. यामुळे पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त वाढविला होता.
वांद्रे पूर्वमधील खेरवाडीत सिद्दिकी यांचा मुलगा आ. झिशान यांच्या कार्यालयाबाहेर काही जण फटाके फोडत होते. त्याच वेळी बाबा सिद्दिकींवर तीन जणांनी गोळीबार केला. याच सिद्दिकींचा मृत्यू झाला. सिद्दीकी यांना बेशुद्ध अवस्थेत लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी सुमारे दोन तास डॉक्टरांनी सिद्दिकींना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतू ते शुद्धीवर न आल्याने अखेर मृत घोषित करण्यात आले.
सिद्दिकींना गोळी लागल्याचे समजताच हजारो कार्यकर्ते लिलावतीच्या इमर्जन्सी गेटसमोर जमा झाले होते. यामुळे पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त वाढविला होता. आज सिद्दिकींच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केले जाणार आहे. यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपविला जाणार आहे. बडी कब्रस्तान मरीन लाईन्स येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील असे सांगितले जात आहे.
दरम्यान, बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे समजताच गृहमंत्री देवेंद्र फड़णवीस हे हॉस्पिटलला पोहोचले होते. याचबरोबर बॉलिवुड अभिनेता सलमान खान, संजय दत्त आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी देखील हॉस्पिटलकडे धाव घेतली होती. सलमान खानने बिग बॉसचे शुटिंगही रद्द केल्याचे समजते आहे.
सलमान-शाहरुखमधील वैर मिटविणारा नेता...
वांद्रे भागातच त्यांचे कार्यक्षेत्र, अनेक चित्रपट अभिनेते, अभिनेत्री या भागात राहत असल्याने बाबा सिद्दिकी आणि त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्या वर्तुळातील आवडता राजकीय नेता अशी त्यांची प्रतिमा होती. अभिनेता सलमान खान आणि सुपरस्टार शाहरुख खान यांच्यातील भांडणे हा चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय होता. या दोघांमधील वाद बाबा सिद्दिकी यांनी मिटविला होता. २००८ मध्ये कतरिना कैफच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या पार्टीत या दोघांमध्ये मतभेद झाल्याची चर्चा होती. दोघांमध्ये वादही झाले, त्यानंतर शाहरुख व सलमान फारसे एकत्र दिसले नाहीत.