कोण म्हणतं भाईजान घाबरला? बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार सलमान खानचा 'चुलबुल पांडे' अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:01 IST2024-10-22T17:00:46+5:302024-10-22T17:01:17+5:30
रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये सलमान खानची एन्ट्री, बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार भाईजानचा 'चुलबुल पांडे' अवतार

कोण म्हणतं भाईजान घाबरला? बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार सलमान खानचा 'चुलबुल पांडे' अवतार
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर बिश्नोई गँगकडून वारंवार सलमानला धमक्या मिळत आहेत. याआधी सलमानच्या घराबाहेर गोळीबारही करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे सलमान सर्व काम थांबवून शूटिंगही रद्द करेल की काय, असा संभ्रम चाहत्यांमध्ये निर्माण झाला होता. पण, बिश्नोईच्या धमक्यांना केराची टोपली दाखवत सलमानने बिग बॉसचं शूटिंग तर केलंच त्याबरोबरच भाईजानने सिंघम अगेनच्या शूटिंगलाही हजेरी लावली.
रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सिनेमात अजय देवगण, रणवीर सिंह, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर अशी बॉलिवूड सेलिब्रिटींची फौज आहे. या सिनेमात अक्षय कुमार कैमिओ करताना दिसणार आहे. अक्षय बरोबरच सलमानही रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये कैमिओ करणार असल्याची चर्चा होती. पण, बिश्नोईच्या धमक्यांमुळे सलमान सिंघम अगेनचं शूटिंग रद्द करणार की काय, अशादेखील चर्चा रंगल्या होत्या. पण, अखेर भाईजानने सिंघम अगेनमध्ये कैमिओ करत त्याचा चुलबूल पांडे अवतार पुन्हा दाखवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांना आणखी एक सरप्राइज मिळणार आहे.
सिंघमचा हा सीक्वल मात्र खऱ्या अर्थाने खास ठरणार आहे. भाईजानमुळे या सिनेमाला चार चांद लागणार आहेत. चुलबुल पांडेच्या एन्ट्रीमुळे सिनेमात मोठा ट्विस्टही पाहायला मिळणार आहे. सलमानचा चुलबुल पांडे आणि अजय देवगणचा बाजीराव सिंघम लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दिवाळीच्या मुहुर्तावर १ नोव्हेंबरला रोहित शेट्टीचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.