बॉलिवूडच्या 'या' खानला 'लाफ्टर शेफ' शोची ऑफर, सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावणार हजेरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 08:41 IST2025-03-18T08:40:26+5:302025-03-18T08:41:23+5:30
मेकर्सने टीआरपीत झेप घेण्यासाठी बॉलिवूडच्या सुपरस्टारला बोलवलं आहे.

बॉलिवूडच्या 'या' खानला 'लाफ्टर शेफ' शोची ऑफर, सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावणार हजेरी?
टेलिव्हिजनवर 'लाफ्टर शेफ' (Laughter Chef S2) या कुकिंग रिएलिटी शोची कमालीची लोकप्रियता आहे. कोणतीही डिश बनवताना सेलिब्रिटींची धांदल उडते हे पाहताना प्रेक्षकांनाही मजा येत आहे. हा शोचा दुसरा सीझन असून पहिला सीझन सुपरहिट झाला होता. टीआरपीमध्ये या शोने १० वे स्थान पटकावले. आता मेकर्सने टीआरपीत झेप घेण्यासाठी बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला (Salman Khan) शोवर येण्याचं निमंत्रण दिलं आहे. सलमानचा आगामी 'सिकंदर' रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्त सलमानही या शोवर येऊ शकतो असा अंदाज आहे.
सध्या लाफ्टर शेफ शोमध्ये रुबिना दिलैक, अंकिता-विकी, मन्नारा चोप्रा, राहुल वैद्य, कृष्णा अभिषेक-कश्मिरा शाह, एल्विश यादव यासह काही सेलिब्रिटी दिसत आहेत. अब्दु रोझिकही शोचा भाग आहे मात्र पुढच्या आठवड्यात तो दिसणार नाही. कारण त्याने रमजानसाठी ब्रेक घेतला आहे. अब्दुच्या जागी शोमध्ये करण कुंद्रा येणार आहे. करण शोच्या पहिल्या सीझनमध्ये होता. करणच्या कमबॅकमुळे सर्वांनाच आनंद होणार आहे. तर दुसरीकडे इंडिया फोरम रिपोर्टनुसार, 'लाफ्टर शेफ सीझन २' मध्ये येत्या एपिसोडमध्ये सलमान खानही दिसणार आहे. सलमान पाहुणा म्हणून शोमध्ये सहभागी होणार आहे आणि आगामी 'सिकंदर' सिनेमाचं प्रमोशन करणार आहे. ईदच्या मुहुर्तावर 'सिकंदर' रिलीज होत आहे.
सलमान खानची 'बिग बॉस'मुळे टेलिव्हिजनवरही लोकप्रियता आहेच. त्यामुळे आता लाफ्टर शेफमध्ये येऊन भाईजान धमाल करणार हे नक्की. त्याच्या चाहतेही या एपिसोडसाठी आतुर आहेत.
'सिकंदर' २८ मार्च रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात सलमान खानसोबत रश्मिका मंदानाची जोडी जमली आहे. ए.आर.मुरुगदास यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.