'मैंने प्यार किया'साठी सलमान खान नव्हता पहिली पसंती, आजारापणामुळे या अभिनेत्याला सोडावा लागला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 01:49 PM2024-05-18T13:49:28+5:302024-05-18T14:08:15+5:30
Salman Khan : १९८९ साली प्रदर्शित झालेल्या मैंने प्यार किया या चित्रपटाने सलमान खानला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. मात्र तो या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हता.
सलमान खान(Salman Khan)ला बॉलिवूडचा सुपरस्टार म्हटले जाते, ज्याचे करिअर १९८९ साली प्रदर्शित झालेल्या मैंने प्यार किया या चित्रपटाने बदलले. या चित्रपटातील चॉकलेटी बॉयचा लूक आणि रोमँटिक स्टाईल चाहत्यांच्या मनाला इतकी भिडली की ते आजपर्यंत विसरू शकले नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का की या चित्रपटासाठी सलमान खान नाही तर दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली होती. पण आजारपणामुळे त्या अभिनेताला हा सिनेमा सोडावा लागला आणि सलमान खानचे नशीब चमकले. हा अभिनेता दुसरा कोणी नसून फराज खान (Faraaz Khan) आहे, ज्याने एकेकाळी बरेच सुपरहिट सिनेमे दिले.
IMdb ट्रिव्हियानुसार, फराज खानला मैंने प्यार कियामध्ये सलमान खानने साकारलेल्या प्रेमच्या भूमिकेसाठी साइन केले होते. मात्र तो गंभीर आजारी पडल्यामुळे त्याच्या जागी सलमानची निवड करण्यात आली. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर फराज खान मेहंदी, फरेब आणि बनूं में तेरी दुल्हन यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याने टीव्ही शोमध्येही काम केले. पण २०२० मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी त्याचे निधन झाले.
फराज खानचे वडील युसूफ खान आहेत. तर फहमन खान त्याचा सावत्र भाऊ आहे. दरम्यान, फहमान खानने आपल्या भावाची आठवण करून देणारा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने काही जुन्या फोटो आणि व्हिडिओंसह भावाची झलक दाखवली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले होते, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू सदैव आमच्यासोबत आहेस. तू आमच्या हृदयात सदैव जिवंत राहशील. मला तुझी आठवण येते पण मला माहित आहे की तू कुठेतरी हसत आहेस आणि आम्हा सर्वांना जीवनाच्या शर्यतीत लढताना पाहत आहेस. कधी कधी हसत म्हणत असशील "हाहा रन फॉरेस्ट रन" माझे तुमच्यावर प्रेम आहे.