सलमान खानच्या ‘या’ हिरोईनवर आली लोकांना टिफिन पुरवण्याची वेळ; म्हणे मला दया नको, हवे काम!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 10:35 AM2019-11-20T10:35:57+5:302019-11-20T10:37:47+5:30
90 च्या दशकात ‘या’ हिरोईनच्या मागेपुढे लोकांची गर्दी असे पण आज हीच हिरोईन गर्दीत हरवली आहे.
सलमान खानच्या ‘वीरगती या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअर सुरु करणारी अभिनेत्री पूजा डडवालने पुढे अनेक चित्रपटांत काम केले. सिंदूर की सौगंध, हिंदुस्तान, जीने नहीं दूंगी, तुमसे प्यार हो गया, कुछ करो ना अशा अनेक चित्रपटांत झळकली. 90 च्या दशकात पूजाच्या मागेपुढे लोकांची गर्दी असे पण आज हीच पूजा गर्दीत हरवली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात टीबी आणि फुफ्फुसांच्या आजाराने खंगलेल्या पूजाकडे उपचारासाठीही पैसे नव्हते. अशास्थितीत सलमान खानसारखा स्टार तिच्या मदतीसाठी सरसावला होता.
त्याने पूजाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलला होता इतकेच नाही तर ती पूर्णपणे ठीक झाल्यावर तिला काहीदिवस गोव्याच्या रेंटल हाऊसमध्येही शिफ्ट केले होते. सध्या पूजा कामाच्या शोधता आहे. होय, पूजाला कुणाचीही दया नको तर काम हवे आहे. एकेकाळी ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी असलेली पूजा सध्या टिफिन सर्विसचे काम करतेय. पण तिला पुन्हा बॉलिवूडमध्ये परतायचे आहे.
नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पूजाने तिच्या सद्यस्थितीबद्दल सांगितले. सध्या मी इंडस्ट्रीतील अनेक लोकांना भेटते आहे. मला दया नको. काम हवे आहे. लोक मला काम देण्याचे आश्वासन देत आहेत. पण आता माझ्याकडे तितका संयम उरलेला नाही. मी पुन्हा अंथरूण पडावे आणि मग लोकांनी मला मदत करावी, असे नको आहे. अद्याप मला कुठलेही काम मिळालेले नाही. माझ्याकडे पैसे नाहीत. पण आत्मविश्वास आहे. या जोरावर मी टिफीन सर्विस सुरु केली आहे. तीन दिवसांपूर्वीच मी हे काम सुरु केले. माझा मित्र व दिग्दर्शक राजेंद्र सिंग याने मला टिफिन सर्विस सुरु करण्याचा सल्ला दिला होता. त्यानेच मला याकामासाठी मदत केली, असे पूजाने सांगितले.
काही दिवसांपूर्वी माझ्या डोक्यावर छप्पर नव्हते. आज राहायला घर आणि खायला अन्न आहे. मला इंडस्ट्रीत काम मिळेल, अशी आशा अजुनही वाटते आहे. कारण मला माझ्यावर आणि परमेश्वरावर विश्वास आहे. सलमानला भेटून मला त्याचे आभार मानायचे आहे. माझ्यासाठी तोच देव आहे. मी बेडवर असताना तो माझ्या मदतीला धावून आला, असेही पूजा म्हणाली.