सलमान आता बाळगणार रिव्हाॅल्व्हर; परवान्यासाठी मुंबई पोलिसांकडून ग्रीन सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2022 10:31 AM2022-08-02T10:31:25+5:302022-08-02T10:34:20+5:30
पंजाबातील प्रख्यात गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानलाही धमकावण्यात आले होते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रील लाइफमध्ये मोठ्या पडद्यावर दोन्ही हातांत बंदुका घेऊन खलनायक आणि त्याच्या टोळीवर बेछूट गोळीबार करणाऱ्या सलमान खानला आता रिअल लाइफमध्येही खरोखरची बंदूक सोबत घेऊन फिरता येणार आहे. मुंबई पोलिसांनी सलमानला स्वसंरक्षणासाठी बंदूक बाळगण्याची परवानगी दिली आहे.
पंजाबातील प्रख्यात गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानलाही धमकावण्यात आले होते. सलमानचेही सिद्धूसारखेच हाल करू, असे बिश्नोई टोळीने जून महिन्यात एका चिठ्ठीद्वारे धमकावले होती. त्यानंतर सलमानने पोलिसांत धाव घेतली. आपल्याला स्वसंरक्षणार्थ बंदूक बाळगण्याची परवानगी द्यावी, असे सलमानने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची सदिच्छा भेट घेऊन सांगितले.
२२ जुलै रोजी सलमानने आयुक्तांची भेट घेतली होती. बंदुकीसाठी अर्जही त्यांच्याकडे दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर सलमानला बंदूक परवान्यासाठी मुंबई पोलिसांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
धमकी पत्रात काय होते?
सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना ५ जून रोजी धमकीचे पत्र मिळाले होते. ‘सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू’, अशी धमकी त्याला देण्यात आली होती.
याची माहिती मिळताच, गृहविभागाने सलमानच्या सुरक्षेत वाढ केली.
सलीम खान वॉकला गेल्यानंतर दररोज जिथे विश्रांती घेतात, तेथील एका बेंचवर हे पत्र सापडले होते.
या पत्रात सलमान आणि सलीम खान दोघांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.