विकी कौशल सोडून सारेच 'रिअल' लाईफमधील हिरो; आर्मीच्या जवानांनी केलंय 'सॅम बहादूर'मध्ये काम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 04:54 PM2023-12-06T16:54:21+5:302023-12-06T16:55:55+5:30
कलाकारांची नाही 'फौजीं'ची फौज! 'सॅम बहादूर'मध्ये विकी कौशलबरोबर झळकले आहेत आर्मीचे जवान
विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या 'सॅम बहादूर' या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय लष्करातील पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर रेखाटण्यात आली आहे. 'सॅम बहादूर' सिनेमात बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने सॅण माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवरही 'सॅम बहादूर' चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. भारतीय लष्कर अधिकाऱ्याची शौर्यगाथा सांगणाऱ्या या सिनेमात खऱ्या आयुष्यातील सैनिकांनी काम केलं आहे. एका मुलाखतीत खुद्द विकी कौशलनेच याचा खुलासा केला आहे.
'सॅम बहादूर'च्या निमित्ताने विकी कौशलने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. 'आजतक'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सॅम बहादूर चित्रपटामध्ये रिअल लाइफ सैनिकांनी काम केल्याचं सांगिलतं. "चित्रपटातील कुठल्याही सीनमध्ये तुम्हाला सैनिक दिसले तर ते खऱ्या आयुष्यातही सैनिक आहेत, हे लक्षात ठेवा. जर आम्ही सिनेमात सिख किंवा आसाम रेजिमेंटमधील सैनिक दाखवले असतील, तर ते त्याच रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत. संपूर्ण सिनेमात फक्त एकच व्यक्ती फौजी नाही आणि तो मी आहे. आणि मी त्यांना त्यांच्या बॉसप्रमाणे ऑर्डर दिल्या आहेत. आम्हाला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली," असं विकी म्हणाला.
'सॅम बहादूर' सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. या सिनेमात विकीबरोबर सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत ३२.५५ कोटींचा गल्ला जमवला आहे.