घटस्फोटानंतर समंथा-नागा चैतन्य पहिल्यांदाच समोरासमोर; एकमेकांना पाहून दिली अशी रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 12:19 PM2021-12-28T12:19:03+5:302021-12-28T12:19:03+5:30
Samantha-naga chaitanya: घटस्फोटानंतरही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असं समंथा आणि नागा चैतन्य यांनी म्हटलं होतं. परंतु, हे दोघंही एकमेकांच्या समोर आले त्यावेळी चित्र वेगळं असल्याचं पाहायला मिळालं.
गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (samantha) आणि नागा चैतन्य (naga chaitanya) या दोघांची सातत्याने चर्चा होत आहे. अलिकडेच या दोघांनी कायदेशीर घटस्फोट घेतला. ही जोडी विभक्त झाल्यानंतर अनेकांनी समंथाचं ट्रोलिंग केलं. या ट्रोलर्सला समंथानेही सडेतोड उत्तर दिलं. इतकंच नाही तर, नागा चैतन्य देखील या घटस्फोटाविषयी व्यक्त झाला होता. विशेष म्हणजे कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच ही जोडी एकमेकांच्या समोर आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, यावेळी त्यांनी एकमेकांना दिलेली रिअॅक्शन थक्क करणारी होती.
घटस्फोटानंतरही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असं समंथा आणि नागा चैतन्य यांनी म्हटलं होतं. परंतु, हे दोघंही एकमेकांच्या समोर आले त्यावेळी चित्र वेगळं असल्याचं पाहायला मिळालं. सध्या या दोघांच्याही आगामी चित्रपटाचं चित्रीकरण एकाच ठिकाणी सुरु आहे. त्यामुळे या दोघांची वरचेवर भेट होतांना दिसत आहे. मात्र, या भेटीत ते एकमेकांपासून अंतर राखून असल्याचं पाहायला मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, समंथा आणि नागा चैतन्य दोघंही त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. या दोघांच्याही चित्रपटांचं चित्रीकरण हैदराबादमधील रमनायडू स्टुडिओमध्ये सुरु आहे. परंतु, ही जोडी एकमेकांच्या समोर आल्यानंतर ते एकमेकांच्या नजरा चुकवतांना दिसत आहेत.
समंथा सध्या 'यशोदा' या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. तर नागा चैतन्य 'Bangarraju' या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. विशेष म्हणजे या दोघांची शक्यतो एकमेकांसोबत भेट होऊ नये यासाठी त्याची टीम प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येतं.
दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी या जोडीने त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना प्रचंड धक्का बसला होता. इतकंच नाही तर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण देखील आलं होतं. समंथा- नागा चैतन्य यांनी जवळपास ३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. परंतु, लग्नाला ४ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.