Samantha Ruth Prabhu : सामंथा रूथ प्रभुची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती? जाणून घ्या नेमकं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 03:19 PM2022-11-24T15:19:09+5:302022-11-24T15:20:00+5:30
Samantha Ruth Prabhu : सामंथा सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतेय. काल सामंथाच्या प्रकृतीबद्दल एक बातमी आली आणि चाहत्यांची चिंता वाढली...
‘पुष्पा’ सिनेमातील ‘ऊ अंटावा’ या गाण्यातील बोल्ड अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेणारी, ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) सध्या प्रकृती कारणामुळे चर्चेत आहे. सामंथा सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतेय. मायोसिटिस आजाराने ती ग्रस्त आहे. सामंथाला मायोसायटीसचं निदान झालं आणि चाहत्यांची चिंता वाढली.
काही दिवसांआधी खुद्द सामंथाने इन्स्टा पोस्ट शेअर करत आपल्या तब्येतीची माहिती दिली होती. मी मायोसायटिस नामक आजाराशी झुंज देत असून आता यातून बरी होतेय, असं तिने या पोस्टमध्ये सांगितलं होतं. याचदरम्यान काल सामंथाच्या प्रकृतीबद्दल एक बातमी आली आणि चाहत्यांची चिंता वाढली. सामंथाला हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता. त्यामुळे अभिनेत्रींच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली होती. पण आता खुद्द सामंथाच्या प्रवक्त्याने याबद्दल खुलासा केला आहे.
‘सामंथाला रूग्णालयात भरती करण्यात आल्याची बातमी खोटी आहे. ही निव्वळ अफवा आहे. सामंथा घरी आहे आणि आराम करत आहे,’ असं ‘इंडिया टुडे’शी बोलताना तिच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं.
सामंथाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, काही दिवसांपूर्वी तिचा ‘यशोदा’ हा सिनेमा रिलीज झाला. तिच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.
आजारपणाबद्दल बोलताना भावुक झाली होती सामंथा...
अलीकडे ‘यशोदा’च्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये आजारपणाबद्दल बोलताना सामंथाला रडू कोसळलं होतं. ‘आजारपणाशी लढत असताना अनेकदा वाटलं आता सगळं संपलं. हा प्रवास चढऊतारांनी भरलेला होता. या आजाराशी झुंज देणं कठीण आहे. पण मी लढण्यासाठी तयार आहे. काही दिवस चांगले असतात, काही दिवस वाईट असतात. अनेकदा आपण निराश होतो. पण अखेर आपण जिंकतो. हे सगळं कठीण आहे. पण मी इथे आहे आणि लढणार आहे,’असं सांगताना तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
सामंथाच्या आजाराबद्दल सध्या वेगवेगळ्या अफवा ऐकायला मिळत आहेत. याबद्दल तिने संताप व्यक्त केला होता. ‘ मी काही बातम्या वाचल्या. त्यात माझी प्रकृती गंभीर असल्याचं लिहिलेलं होतं. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की, हा काही जीवघेणा आजार नाही. मी अद्याप मेली नाहीये. माझ्या मते, अशा हेडलाइन्सची गरज नाही,’असं ती म्हणाली होती.