किरण रावच्या 'त्या' विधानावर संदीप रेड्डी वांगा यांचा पलटवार, म्हणाला, 'जा आणि आमिर खानचा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 05:23 PM2024-02-02T17:23:50+5:302024-02-02T17:24:38+5:30
वांगा यांनी आमिर खानच्या जुन्या 'दिल' सिनेमाचा उल्लेख केला आहे.
'कबीर सिंह' आणि Animal सारख्या सिनेमांना जितकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं तितकीच टीकाही झाली. या सिनेमांनंतर प्रेक्षकांचे दोन गट पडले. कोणाला मनोरंजन म्हणून सिनेमा आवडला तर कोणी टीकात्मकदृष्ट्या सिनेमाकडे पाहिलं. काही दिवसांपूर्वी आमिर खानची पत्नी किरण रावने (Kiran Rao) हे सिनेमे महिला विरोधी असल्याचं विधान केलं होतं. किरण रावच्या याच विधानावर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep reddy Vanga) यांनी पलटवार केला आहे.
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर Animal सिनेमानंतर जास्तच टीका होत आहे. दरम्यान दैनिक भास्करशी केलेल्या चर्चेत त्यांनी नाव न घेता किरण रावला उत्तर दिलं आहे. यावेळी वांगा यांनी आमिर खानच्या जुन्या 'दिल' सिनेमाचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले, 'काही लोकांना कळतंच नाही की ते काय बोलत आहेत. एका असिस्टंट डायरेक्टरने मला एका सुपरस्टारच्या पूर्वपत्नीचं एक आर्टिकल दाखवलं. ज्यामध्ये ती म्हणते की कबीर सिंह आणि बाहुबली सारखे चित्रपट महिला विरोधाला प्रोत्साहन देतात, स्टॉकिंगला प्रमोट करतात. मला वाटतं की त्यांना स्टॉकिंग आणि अप्रोचिंग यातला फरक माहित नसावा."
ते पुढे म्हणाले, "जा आणि आमिर खानला त्याच्या खंबे जैसी खडी हो गाण्याबद्दल विचार. ते काय होतं? मग माझ्याकडे या. तुम्हाला जर दिल सिनेमा लक्षात असेल ज्यात तो बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो, तो याची जाणीव करुन देतो की तो काहीतरी चुकीचं करत आहे आणि नंतर तो प्रेमात पडतो. ते सगळं काय होतं? मला कळत नाही लोक आजुबाजूला न बघताच का बोलायला सुरुवात करतात.'
'दिल' सिनेमात आमिर खानसोबत माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होती. या सिनेमात आमिर खान माधुरीवर जबरदस्ती करण्याची धमकी देतो. हा सिनेमा तेव्हा सुपरहिट झाला होता. तसंच हा सीनही खूप चर्चेत होता. याच सीनचं उगाहरण देत संदीप रेड्डी वांगा यांनी स्वत:च्या सिनेमांचा एकप्रकारे बचाव केला आहे.