'ॲनिमल'मध्ये बॉबी देओल मूक-बधीर का आहे? दिग्दर्शक म्हणाले, "खलनायकाची डायलॉगबाजी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 09:22 IST2025-02-28T09:22:18+5:302025-02-28T09:22:54+5:30
संदीप रेड्डी वांगांनी केलं स्पष्ट, कारण सांगत म्हणाले...

'ॲनिमल'मध्ये बॉबी देओल मूक-बधीर का आहे? दिग्दर्शक म्हणाले, "खलनायकाची डायलॉगबाजी..."
२०२३ साली आलेल्या रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'ॲनिमल' (Animal) सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. संदीप रेड्डी वांगा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात शिव्या, रक्तपात, हिंसा असं सगळंच होतं. त्यामुळे काहींनी सिनेमावर टीकाही केली तरी तुफान कमाईही करुन दिली. रणबीर कपूरच्या करिअरमधला हा ब्लॉकबस्टर हिट ठरला. तर दुसरीकडे बॉबी देओलचं (Bobby Deol) सर्वांना सरप्राईज होतं. १५ मिनिटांच्या खलनायकाच्या भूमिकेतूनही तो भाव खाऊन गेला. यामध्ये तो मुका आणि बहिराही दाखवण्यात आला आहे. पण असं का? यावर नुकतंच संदीप वांगा यांनी खुलासा केला आहे.
संदीप रेड्डी वांगा यांनी कोमल नाहटाला दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' मधील बॉबी देओलच्या कॅरेक्टरवर भाष्य केलं. ते म्हणाले, "सिनेमात भावनिक आणि फॅमिली ड्रामा दाखवण्यात आला आहे. म्हणूनच बॉबीच्या भूमिकेसाठी आम्हाला डायलॉग्स कमीच ठेवायचे होते. सिनेमांमध्ये आपण डायलॉगबाजी पाहतोच. मला वाटलं बॉबीला मूकबधीर दाखवणं इंटरेस्टिंग होऊ शकतं. जो बोलू शकत नाही आणि ऐकूही शकत नाही अशा माणसाशी लढण्याची कल्पना मला फारच भारी वाटली."
ॲनिमल मधील भूमिकेनंतर बॉबी देओलचं नशीबच पालटलं. त्याच्या करिअरला कलाटणी मिळाली. त्याला विशेषकरुन दाक्षिणात्य सिनेमांच्या ऑफर्स आल्या. 'कंगुआ','डाकू महाराज' या सिनेमांमध्ये त्याने व्हिलनचं काम केलं. आता तो आगामी 'जननायगन' सिनेमात दिसणार आहे. तसंच त्याची 'आश्रम सीरिज पार्ट ३' ही येत आहे.