संदीप सोपारकर यांची इंडिया फाईन आर्ट्स कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 06:44 PM2019-04-11T18:44:50+5:302019-04-11T18:45:21+5:30
इंडिया फाईन आर्ट्स कौन्सिलचे अध्यक्ष हरेश मेहता व उपाध्यक्ष राजेश श्रीवास्तव यांनी संदीप सोपारकर यांची कौन्सिलचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
इंडिया फाईन आर्ट्स कौन्सिलचे अध्यक्ष हरेश मेहता व उपाध्यक्ष राजेश श्रीवास्तव यांनी संदीप सोपारकर यांची कौन्सिलचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. या दरम्यान मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कौन्सिलने नवनियुक्त अध्यक्ष संदीप सोपारकर यांना चेन्नई येथील श्री. श्रीहरी यांच्या नेतृत्वाखालील 'माय क्युट मिनी' कंपनीने खास बनवलेली थ्रीडी प्रतिकृती भेट दिली. याव्यतिरिक्त सोपारकर यांना कौन्सिलने श्री. व श्रीमती रोनक जैन यांनी बनवलेला सोपारकर यांच्या हाताचा ब्राँझचा साचा स्मृतिचिन्ह म्हणून भेट दिला.
गेले दीड दशक संदीप सोपारकर नव्या आणि उभरत्या, तसेच प्रथितयश कलाकारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी कार्यरत आहेत. तसेच ते क्लासिक लॅटिन आणि बॉलरूम नृत्यप्रकारांची भारतात ओळख करून देण्यामध्येही अग्रेसर राहिले आहेत. जगभरातील लोकांना प्रशिक्षण देण्याव्यतिरिक्त त्यांनी नृत्याचे आपल्या जीवनातील महत्व पटवून देणारी भाषणे आणि कार्यशाळा सुद्धा आयोजित केल्या आहेत. या सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकाला त्यांच्या हॉलीवूड आणि बॉलीवूड मधील अप्रितम कामासाठीसुद्धा विशेषरित्या सन्मानित केले गेले आहे.
यावेळी संदीप सोपारकर म्हणाले, “हा क्षण आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील. मला देण्यात आलेले प्रेम आणि सन्मान मी कधीही विसरू शकत नाही, मी पुरता भारावून गेलो आहे. इंडिया फाईन आर्ट्स कौन्सिलचे ध्येय सर्व प्रकारच्या कला आणि कलाकारांना पाठबळ देणे आहे आणि मी माझी ही जबाबदारी सर्वोत्तम प्रकारे सांभाळेन.”
इंटरनेट सेलेब्रिटी रत्न प्रताप आणि नृत्यांगना व अभिनेत्री अंकिता डोलावत यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमाला सिमरन अहुजा, डॉ. उमा रेळे, शुभ मल्होत्रा आणि इतर कलाकारांची उपस्थिती लाभली. सुप्रसिद्ध कलाकार निलेश औती यांनी सुरेख लाईव्ह पेंटिंग काढले, ‘मास्क' या तरुण कलाकारांच्या बँडने त्यांच्या गाण्यांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली. गायक फझल अब्बास जाफरी आणि तबलावादक धैवत मेहता यांनी सुरेल हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची झलक दाखवली आणि गुरुवर्य संदीप सोपारकर यांनी नालंदा नृत्यालय महाविद्यालय, भरूचा स्कूल ऑफ बॅले आणि मिरीयड आर्ट्स च्या विद्यार्थ्यांबरोबर सर्व नृत्यप्रकारांना एकत्र गुंफणारा नृत्याविष्कार सादर केला.
संदीप हे आंतरराष्ट्रीय नृत्यप्रकारांना मोठ्या पडद्यावर घेऊन येणाऱ्या आणि बॉलरूम आणि लॅटिन नृत्यसंस्कृतीची भारतीय नृत्यरसिकांना ओळख करून देणाऱ्या आणि त्याशिवाय त्यांना भारतीय टीव्हीवरील रिएलिटी शोजमध्ये लोकप्रिय बनवणाऱ्या पहिल्या काही नृत्यदिग्दर्शकांपैकी एक आहेत. सोपारकरांच्या काही नावाजलेल्या कृतींमध्ये झुबेदा, काईट्स, सात खून माफ आणि मंगल पांडे इत्यादी चित्रपटांसाठी केलेल्या नृत्यदिग्दर्शनाचा समावेश होतो. त्याशिवाय त्यांनी मॅडोना, ब्रिटनी स्पिअर्स आणि बियॉन्से नोवेल्स सारख्या आंतरराष्ट्रीय हस्तींना नृत्याचे प्रशिक्षण देऊन आणि त्याचबरोबर जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नृत्याबद्दल अभिभाषणे करून भारताचे नाव जागतिक पटलावर नेऊन ठेवले आहे. आजही बॉलीवूड मधील नव्याने चमकणारे कलाकार संदीप सोपारकारांचेच शिष्य असतात.