खरंच रेखा 6 वर्षांनी लहान संजय दत्तच्या प्रेमात पडली होती? एक प्रेम कहाणी... किती खरी, किती खोटी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 12:58 PM2022-07-29T12:58:51+5:302022-07-29T12:59:32+5:30
Rekha And Sanjay Dutt Secret Marriage And Affair : होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण कधीकाळी या दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात होती. इतकंच नाही तर अगदी रेखा व संजयने गुपचूप लग्न केल्याचीही कुजबूज सुरू झाली होती.
Sanjay Dutt birthday : बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या लव्ह अफेअर्सचे एक ना अनेक किस्से आजही चवीने चघळले जातात. बॉलिवूडची अनेक अफेअर्स गाजलीत. यापैकीचं एक अफेअर होतं रेखा (Rekha)आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांचं. होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण कधीकाळी या दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात होती. इतकंच नाही तर अगदी रेखा व संजयने गुपचूप लग्न केल्याचीही कुजबूज सुरू झाली होती. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा हेडलाईन्स बनू लागल्या होत्या. हे प्रकरण इतकं वाढलं होतं की अखेर संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांना या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली होती.
आता या लव्हस्टोरीत किती तथ्य आहे, किती नाही हे माहित नाही. पण हो, एकेकाळी या प्रेमकहाणीनं सगळ्यांना हैराण केलं होतं. रेखा त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान संजय दत्तच्या प्रेमात पडली, हे ऐकून सगळेच हैराण झाले होते.
असं म्हणतात की, या प्रेम कहाणीची सुरूवात 1984 साली झाली होती. रेखा व संजयने 1984 साली प्रदर्शित ‘जमीन आसमान’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. या चित्रपटानंतरच रेखा व संजूबाबाच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 80 च्या दशकात रेखा मोठी स्टार होती तर संजय दत्तची जेमतेम सुरूवात होती. त्याच्या खासगी आयुष्यात फार काही सुरळीत सुरू नव्हतं. करिअरची नौका बुडू लागली होती. असं म्हणतात की, रेखानं या काळात त्याला आधार दिला. संजय दत्तला ड्रग्जचं व्यसन लागलंय, हे सुद्धा तिला माहित होतं. या अशा काळात रेखाने संजयला बरीच मदत केली आणि इथून दोघांच्या अफेअरच्या चर्चेला निमित्त मिळालं. फक्त अफेअर नाही तर दोघांनी मंदिरात गुपचूप लग्न केल्याचं म्हटलं गेलं. ऋषी कपूर व नीतू सिंग यांच्या लग्नात रेखाच्या भांगेत कुंकू होतं. हे पाहून तर अनेकांनी रेखा संजयच्या नावाचं कुंकू लावते, इथपर्यंत म्हटलं होतं.
या सगळ्या बातम्यांनी सुनील दत्त यांची चिंता वाढवली नसेल तर नवल. अखेर त्यांनी संजयला तंबी दिली होती. अशा फालतू गोष्टीत पडू नकोस, असं त्यांनी संजयला बजावलं होतं. रेखा कधीच या प्रकरणावर बोलली नाही. तिला खुलासा करण्याची कधीच गरज वाटली नाही. पण हो, एका मुलाखतीत संजय यावर बोलला होता.
या सगळ्या अफवा आहेत. जमीन आसमान चित्रपटानंतर आमच्याबद्दल नको त्या बातम्या पसवल्या गेल्या. पण आमच्यात असं काहीही नव्हतं, असं तो म्हणाला होता.