‘वापसी’नंतरचे दोन्ही चित्रपट फ्लॉप! संजूबाबाला ‘स्टारडम’ची चिंता!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 08:32 AM2018-08-07T08:32:14+5:302018-08-07T08:33:05+5:30
संजय दत्तकडे कामाची कमतरता नाही. पण यशाने मात्र संजूबाबाची साथ नक्कीच सोडली आहे. होय, आधी संजूबाबाकडे पाहून लोक त्याच्या चित्रपटाचे तिकिट खरेदी करायचे. पण आता तो काळ बराच मागे पडला आहे.
संजय दत्तकडे कामाची कमतरता नाही. पण यशाने मात्र संजूबाबाची साथ नक्कीच सोडली आहे. होय, आधी संजूबाबाकडे पाहून लोक त्याच्या चित्रपटाचे तिकिट खरेदी करायचे. पण आता तो काळ बराच मागे पडला आहे. कमबॅकनंतर अनेक प्रयत्न करूनही संजयला तो काळ पुन्हा निर्माण करता आलेला नाही. गतवर्षी सप्टेंबरमध्ये आलेला ‘भूमी’ ते गत महिन्यात आलेला ‘साहब, बीवी और गँगस्टर3’च्या अपयशाने संजय निराश आहे. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर संजयने ‘भूमी’तून कमबॅक केले होते. पण हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर १० कोटीही कमाऊ शकला नाही. यानंतरच्या ‘साहब, बीवी और गँगस्टर3’ने सुद्धा संजयची निराशाच केली. चित्रपटाची लागतही वसूल होऊ शकली नाही. हा सिनेमा ‘साहब, बीवी और गँगस्टर’ या फ्रेन्चाईजीमधील सर्वात कमी कमाई करणारा सिनेमा ठरला.
खरे तर संजयच्या आयुष्यावर आलेला ‘संजू’ सुपरडुपर हिट झाल्याने ‘साहब, बीवी और गँगस्टर3’च्या मेकर्सला बऱ्याच अपेक्षा होत्या. ‘संजू’चा फायदा ‘साहब, बीवी और गँगस्टर3’ला मिळणार, अशी आशा त्यांना होती. पण ही आशा धूळीस मिळाली. चर्चा खरी मानाल तर ‘साहब, बीवी और गँगस्टर3’ हा पाठोपाठ दुसरा सिनेमाही फ्लॉप झाल्यामुळे संजय बिथरला आहे. त्याचा राग काहीसा दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया यांच्यावरही आहे. धूलिया यांनी त्यांची आवडती हिरोईन माही गिल हिची भूमिका वाढवण्यासाठी चित्रांगदा व संजय दत्तच्या काही दृश्यांवर कात्री चालवली आणि यामुळे चित्रपटाच्या कथेतील आत्मा हरवला, असे बाबाचे मत आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या कुठल्याही प्रमोशनल इव्हेंटला तो हजर नव्हता. या चित्रपटानंतर संजयला करिअरची चिंता सतावू लागली आहे. गत जुलैमध्ये तो ५९ वर्षांचा झाला. त्यामुळे हिरो व हिरोईनच्या रोमान्सचे वय निघून गेले आहे. ‘साहब, बीवी और गँगस्टर3’मध्ये माही व चित्रांगदासोबत रोमान्स करणारा संजय कुणालाच आवडला नाही. ‘भूमी’मध्येही हिरोईनच्या वडिलांच्या भूमिकेत त्याला लोकांनी स्वीकारले नाही. एकंदर काय तर २००६ पासून ‘मुन्नाभाई’नंतर संजूला एकही हिट देता आला नाही. अशात काय करावे, या चिंतेने संजूबाबाला ग्रासले नसेल तर नवल!
लवकरच संजय ‘प्रस्थानम’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, अली फजल, मनीषा कोईराला आहेत़ पण सगळ्यांत मोठा स्टार संजयचं आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या यशापयशाचा जिम्माही संजयचा असणार आहे.