Exclusive: 'छावा' मराठीत का बनला नाही? संतोष जुवेकरने मांडलं थेट मत; म्हणाला, "तसा अभ्यासू, हुशार..."
By ऋचा वझे | Updated: January 24, 2025 17:43 IST2025-01-24T17:41:45+5:302025-01-24T17:43:02+5:30
संतोष जुवेकरची सिनेमात नक्की भूमिका काय माहितीये का?

Exclusive: 'छावा' मराठीत का बनला नाही? संतोष जुवेकरने मांडलं थेट मत; म्हणाला, "तसा अभ्यासू, हुशार..."
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित सिनेमा 'छावा' १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र हा सिनेमा मराठी नसून हिंदीत येत आहे. मॅडॉक फिल्म्स सिनेमाची निर्मिती करत आहेत तर लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर आला. विकीच्या अभिनयाने अक्षरश: थिएटर दणाणून सोडणारा असा हा अनुभव असणार हे नक्की. या सिनेमात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही (Santosh Juvekar) महत्वाच्या भूमिकेत आहे.
'छावा'हा मराठी कादंबरीवर आधारित असणारा सिनेमा मराठीत होत नाही तर हिंदीत होतो. असं का हा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. 'लोकमत फिल्मी'शी बोलताना संतोष जुवेकर म्हणाला, "हिंदी भाषा डोळ्यासमोर ठेवून केलेला सिनेमा आहे. कारण सिनेमा करायचा म्हटलं की बजेट खूप महत्वाचं असतं. ती भव्यता, तो Aura उभं करण्यासाठी पैसा लागतोच. तसंच कितीही बजेट असलं तरी सिनेमा करण्याकरिता तेवढी क्षमता असलेला, अभ्यासु, हुशार असा दिग्दर्शकही हवा. तशी माणसंही लागतात. मराठीत तसे लेखक, दिग्दर्शक आहेत पण बजेट नाही. मराठी सिनेमा ग्लोबल नाही याची खंत वाटतेच. छत्रपती संभाजी महाराजांवर हिंदीत सिनेमा केल्यामुळे तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकतो असंही मला वाटतं."
Exclusive: "घोडेस्वारी शिकलो, विकी कौशल सोबत सेटवर..."; संतोष जुवेकरने सांगितला 'छावा'चा अनुभव
संतोष जुवेकर 'छावा' मध्ये रायाजी मालगे या भूमिकेत झळकणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या ८ मुख्य योद्ध्यांमध्ये रायाजी हे देखील एक आहेत. या भूमिकेसाठी त्यानेही विकीसोबत २ महिने प्रशिक्षण घेतलं. घोडेस्वारी, तलवारबाजी,भालाफेकही शिकला. संतोषला या सिनेमात पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. १४ फेब्रुवारी रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.