दिवाळीच्या मुहुर्तावर सारा अली खानची आईसोबत कोट्यवधींची खरेदी, मुंबईत घेतल्या दोन प्रॉपर्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:23 AM2024-10-17T11:23:50+5:302024-10-17T11:24:23+5:30
मुंबईतील अंधेरी भागात ही प्रॉपर्टी आहे. ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर मायलेकींनी ही मोठी खरेदी केल्याचं दिसतंय.
अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि तिची आई अमृता सिंह (Amruta Singh) बी टाऊनमध्ये अनेकदा चर्चेत असतात. मायलेकीचे ट्रीपचे फोटो असो किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता दोघींबद्दल आणखी एक अपडेट समोर आली आहे. त्यांनी मुंबईत करोडोंच्या दोन प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. मुंबईतील अंधेरी भागात ही प्रॉपर्टी आहे. ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर मायलेकींनी ही मोठी खरेदी केल्याचं दिसतंय.
सारा अली खान आणि अमृता सिंह यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात एकूण २२.२६ कोटींमध्ये दोन ऑफिस खरेदी केले आहेत आणि रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक केली आहे. फ्लोरटॅप साईटनुसार, मायलेकीने वीर सावरकर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वीरा देसाई रोज स्थित सिग्नेचर इमारतीत नवव्या मजल्यावर हे दोन ऑफिस घेतले आहेत.
यापैकी एका ऑफिसची किंमत ११.१३ कोटी रुपये आहे ज्यासाठी ६६.८ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. दोन्ही ऑफिसचे एरिया जवळपास २ हजार स्क्वेअप फूट आहे. तीन पार्किंगचीही सोय आहे. १० ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी ही प्रॉपर्टी रजिस्टर केली होती. जुलै २०२३ मध्ये त्याच इमारतीत दोघींनी चौथ्या मजल्यावर ९ कोटीमध्ये आणखी एक ऑफिस घेतलं होतं. ज्यासाठी ४१.०१ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली होती.
२०२४ मध्ये साराचे आईवडील अमृता सिंह आणि सैफ अली खान वेगळे झाले होते. साराला एक लहान भाऊ इब्राहिम अली खानही आहे जो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.