सारा अली खानने घेतला कामाख्या देवीचा आशीर्वाद, फोटो शेअर करताच झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:22 AM2021-07-12T11:22:18+5:302021-07-12T11:22:37+5:30
साराने कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने काही जणांची तिचे कौतुक केले आहे. पण काहींना तिचे मंदिरात जाणे नापसंद केले.
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan ) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. जिथे जाईल तिथले फोटो सारा सोशल मीडियावर शेअर करते. कधी काश्मीर तर कधी मालदीवचे फोटो शेअर करणा-या साराला फिरण्याची प्रचंड आवड आहे. अलीकडे सारा आसामातील सुप्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. यादरम्यानचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. पण तिचे हे फोटो पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. (Sara Ali Khan gets brutally trolled for sharing pictures from Kamakhya temple in Assam)
फोटोंमध्ये सारा पांढ-या रंगाच्या सलवार सूटमध्ये आहे. गळ्यात आसामचा पारंपरिक स्कार्फ आहे. माथ्यावर टिळा आहे. साराचे फोटो पाहून काही लोकांनी तिचे कौतुक केले. पण काहींनी मात्र तिला ट्रोल करायला सुरूवात केली. तिच्या धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तू मुस्लिम आहेस की हिंदू? असा सवाल अनेकांनी तिला केला. अन्य एका युजरने तर तिला हिंदू वा मुस्लिम यापैकी कोणताही एक धर्म निवडण्याचा सल्ला दिला. नाव मुस्लिम, ओळख हिंदू..., माझा सल्ला मान आणि कोणताही एक धर्म निवड, असे या युजरने लिहिले.
याआधीही अशाच कारणाने सारा ट्रोल झाली आहे. गंगा आरतीत सहभागी झाल्यावरून लोकांनी तिला असेच ट्रोल केले होते. काही महिन्यांपूर्वी सारा तिची आई अमृता सिंगसोबत अजमेर शरीफला गेली होती. त्याचे फोटोही तिने शेअर केले होते.
साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, 2018 साली ‘केदारनाथ’ या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. त्यानंतर त्याच वर्षी तिचा रणवीर सिंगसोबत ‘सिम्बा’ हा चित्रपट रिलीज झाला होता. 2020 मध्ये साराचे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. कार्तिक आर्यनसोबत ‘लव्ह आज कल’ आणि वरूण धवनसोबत ‘कुली नंबर 1’मध्ये ती दिसली होती. लवकरच सारा ‘अतरंगी रे’ या चित्रपटात झळकणार आहे. यात अभिनेता अक्षय कुमार व धनुष मुख्य भूमिकेत आहेत.