सरोज खान मुंबईच्या मातीत ‘सुपूर्द ए खाक’, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 10:05 AM2020-07-03T10:05:56+5:302020-07-03T10:06:15+5:30
बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला.
बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. आज सकाळी त्यांचे निधन झाले. निधनानंतर लगेच मलाड येथील दफनभूमीत त्यांना ‘सुपूर्द ए खाक’ करण्यात आले. यावेळी केवळ त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होत्या.
तीन दिवसानंतर सरोज यांची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे. सरोज खान यांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली होती. पण ही चाचणी निगेटिव्ह आली होती. तेव्हापासून त्या रुग्णालयातच दाखल होत्या. दरम्यान, प्रकृती अधिकच खालावल्यानंतर आज सरोज खान यांचं निधन झालं आहे. गेल्या २० जूनपासून मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज सकाळी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सरोज खान यांनी १९८६ पासून २०१९ पर्यंत अनेक सिनेमांमध्ये कोरियाग्राफी केली होती. ज्यात निंबुडा-निंबुडा, एक-दोन तीन, डोला रे डोला, काटे नही कटते, हवा-हवाई, ना जाने कहा से आई है, दिल धक धक करने लगा, हमको आजकल है इंतजार, चोली के पीछे यासारख्या अनेक सुपरहिट आणि ऐतिहासिक गाण्यांचा समावेश आहे.
सरोज खान यांनी तेजाब, खलनायक, मिस्टर इंडिया, चालबाज, नगीना, चांदनी, हम दिल दे चुके सनम, देवदास सारख्या प्रसिद्ध सिनेमातील कोरियाग्राफी केली होती. सरोज खान यांचे शेवटचे गाणं कलंक सिनेमातीत तबाह हो गए यासाठी कोरियाग्राफ केले होते. या गाण्यात माधुरी दिक्षित डान्स करताना दिसत आहे.
सरोज खान यांनी शिकवलेल्या नृत्यमुळे बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना यश मिळाले. 1983 साली त्यांनी 'हिरो' चित्रपटातील गाण्यांची कोरियोग्राफी केली होती. तर कलंक हा त्याच्या शेवटचा सिनेमा आहे. आपल्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी सरोज खान यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.