श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या शशिकलावर आली होती घरकाम करायची वेळ; 'या' अभिनेत्रीच्या घरी केलं होतं काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 17:59 IST2022-02-10T17:58:47+5:302022-02-10T17:59:31+5:30
Sasikala: शशिकला यांनी आजवर बॉलिवूडमध्ये असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांची प्रत्येक भूमिका त्याकाळी तुफान गाजली.

श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या शशिकलावर आली होती घरकाम करायची वेळ; 'या' अभिनेत्रीच्या घरी केलं होतं काम
७० चा काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला साऱ्यांच्याच स्मरणात असतील. जवळपास १०० पेक्षा जास्त बॉलिवूडपटात काम करणाऱ्या शशिकला यांचं ४ एप्रिल २०२१ रोजी निधन झालं. परंतु, आजही त्या प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. मराठी कुटुंबात जन्मलेल्या शशिकला यांनी बॉलिवूडमध्ये अनेक भूमिका गाजवल्या. परंतु, एकेकाळी त्यांनी प्रचंड हालाखीचे दिवस जगले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्यावर ओढावलेल्या आर्थिक संकटाविषयी भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर, प्रसिद्धीच्या वलयात गुंडाळलेल्या या अभिनेत्रीला चक्क एकेकाळी एका अन्य दुसऱ्या अभिनेत्रीच्या घरी घरकाम करावं लागलं होतं.
शशिकला यांचा जन्म सोलापूरातील एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील मोठे व्यावसायिक असल्यामुळे घरची परिस्थिती चांगली होती. मात्र, शशिकला लहान असताना त्यांच्या वडिलांना बिझनेसमध्ये मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी, संसारगाडा चालवण्यासाठी शशिकला यांच्या वडिलांनी कुटुंबासह मुंबई गाठली. पण, मुंबईत आल्यावरही त्यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडला नाही.
शशिकला यांच्या कुटुंबावर ओढावलं आर्थिक संकट
"शशिकला यांनी एका मुलाखतीत त्यांच्यावर बेतलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं होतं. माझे वडील त्यांची सगळी कमाई त्यांच्या धाकट्या भावाला पाठवून द्यायचे. त्यावेळी तो लंडनमध्ये त्याचं शिक्षण पूर्ण करत होता. आम्ही घरात सहा लहान भावंड होतं. पण, माझ्या वडिलांनी कायम कुटुंबापूर्वी आपल्या भावाला प्रथम प्राधान्य दिलं. मात्र, एक वेळ अशी आली की माझ्या काकाला खूप चांगली नोकरी मिळाली. परिणामी, त्यांना आमच्या कुटुंबाचा विसर पडला. माझ्या वडिलांचं दिवाळं निघालं होतं. तो काळ आमच्यासाठी खरंच फार कठीण होता", असं शशिकला म्हणाल्या होत्या.
पुढे त्या म्हणतात, "एक वेळ अशीही आली होती की आम्ही 8-8 दिवस उपाशी रहायचो आणि कोणी तरी आम्हाला जेवायला बोलवेल या आशेवर असायचो."
शशिकला यांनी केलं घरकाम
"घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मी घरकाम करायला सुरुवात केली होती. त्यावेळी माझी भेट अभिनेत्री, गायिका नूरजहाँ यांच्यासोबत झाली. मी त्यांच्याकडे घरकाम करायचे. माझ्यातील अभिनय गुण त्यांना आवडल्यामुळे त्यांनी माझ्याविषयी त्यांच्या पतीला सांगितलं. विशेष म्हणजे त्यांच्या पतीमुळे मला १९४५ मध्ये जीनत या चित्रपटातमध्ये काम करायची संधी मिळाली. त्यावेळी मला २५ रुपये मानधन मिळालं होतं. इतंकच नाही तर या चित्रपटानंतर माझ्याकडे एकामागून एक चित्रपटांच्या रांगा लागल्या."
दरम्यान, शशिकला यांनी आजवर बॉलिवूडमध्ये असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांची प्रत्येक भूमिका त्याकाळी तुफान गाजली.