आधी नाक नीट कर, मग ये..., म्हणत निर्मात्यानं त्याला हाकलून लावलं होतं...! वाचा, ‘छोरी’च्या हिरोची स्ट्रगल कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 08:00 AM2021-12-05T08:00:00+5:302021-12-05T08:00:02+5:30
होय, नुकताच ‘छोरी’ या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसलेला सौरभ गोयल याला चार वर्षांपूर्वी नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला निर्मात्यांनी दिला होता.
ग्लॅमर इंडस्ट्रीत चेहरा महत्त्वाचा आहेच. असं नसतं तर अनेकांनी कधी नाकाची, कधी ओठांची अशी सर्जरी करून घेतली नसती. स्ट्रगल काळात दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा अशा अनेकींनी सर्जरी करण्याचा सल्ला दिला गेला होता. काळानुसार समीकरण बदलू लागली आहेत. पण अजूनही नाकीडोळी नीट हवीच, हा अट्टाहास आहेच. आजही अगदी अभिनेत्यांनाही सर्जरीचा सल्ला दिला जातो. होय, अभिनेता सौरभ गोयल (Saurabh Goyal ) याचं ज्वलंत उदाहरण.
होय, नुकताच ‘छोरी’ (Chhori) या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसलेला सौरभ गोयल याला चार वर्षांपूर्वी नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला निर्मात्यांनी दिला होता. एका ताज्या मुलाखतीत खुद्द सौरभने हा अनुभव सांगितला.
चार वर्षांपूर्वी सौरभ एका मोठ्या निर्मात्याकडे ऑडिशनसाठी गेला होता. त्या निर्मात्याने सौरभकडे पाहिलं आणि काय विचार करून तू माझ्याकडे आलास? असा पहिला प्रश्न विचारला.
हिरो बनण्यासाठी परफेक्ट बॉडी हवी. लीड रोलसाठी तुझ्याकडे तर काहीच नाहीये. माझ्यासोबत काम करायचं असेल तर आधी नोज जॉब करून ये, असं त्या निर्मात्यानं सौरभला ऐकवलं.
निर्मात्यांचे ते शब्द ऐकून सौरभ जणू जागच्या जागी थिजला होता. याबद्दल त्याने सांगितलं, ‘निर्मात्याचे ते शब्द ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं. नाकाची सर्जरी करायला माझ्याकडे पैसा नव्हता. घरच्यांनी तर थेट सिनेमाचा नाद सोड असं बजावलं होतं. नोकरी कर, लग्न कर, असा त्यांचा तगादा सुरू असायचा. यामुळे मी बाबांसोबत बोलणंही बंद केलं होतं. इंडस्ट्रीत तुला काहीही भविष्य नाही. ना तुझा गॉडफादर आहे, ना तुझ्याकडे लुक्स आहे, असं अनेक जण म्हणत. अनेकांनी इंडस्ट्रीत मला दात नीट करायचा, नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मी याही वेळी दुर्लक्ष केलं. कारण नाकाची सर्जरी करून मी हिरो होऊ शकतो, यावर माझा विश्वास नव्हता. याऊलट स्वत:वर मात्र माझा प्रचंड विश्वास होता. मी चालत राहिलो. रोज ऑडिशन देणं सुरू ठेवलं. नकार पचवायला शिकलो. रोज मला चार पाच नकार मिळायचे. पण मी त्यातून शिकत गेलो आणि आज ‘छोरी’ सिनेमात लीड हिरो म्हणून दिसतोय.