‘सीरियल किसर’ अभिनेता इम्रान हाश्मीचा ‘व्हाय चीट इंडिया’ पायरसीच्या कचाट्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 05:58 PM2019-01-20T17:58:00+5:302019-01-20T17:58:35+5:30
दिग्दर्शक सौमिक सेन यांनी शिक्षण क्षेत्रात कशाप्रकारे फसवणूक सुरू आहे, भ्रष्टाचाराची कीड ज्ञानगंगेला प्रदूषित करत आहे आणि शिक्षण क्षेत्रात माफियांची घुसखोरी झाली आहे याचं प्रतिकात्मक चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढत असल्याचे आपण वारंवार ऐकत आहोत. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला गैरव्यवहाराची कीड लागल्याचंही ऐकायला मिळतं. हाच गंभीर आणि महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडणारा ‘व्हाय चीट इंडिया’ हा हिंदी चित्रपट. दिग्दर्शक सौमिक सेन यांनी शिक्षण क्षेत्रात कशाप्रकारे फसवणूक सुरू आहे, भ्रष्टाचाराची कीड ज्ञानगंगेला प्रदूषित करत आहे आणि शिक्षण क्षेत्रात माफियांची घुसखोरी झाली आहे याचं प्रतिकात्मक चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या चित्रपटाच्या आणि इमरानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ती अशी की, हा चित्रपट पायरसीच्या कचाटयात अडकला आहे.
इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेला 'व्हाय चीट इंडिया' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र, प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांतच चित्रपटाला पायरसीचे ग्रहण लागले आहे. तामिळरॉकर्स या वेबसाईटने हा संपूर्ण चित्रपट इंटरनेटवर लीक केला आहे.
याआधीही 'द अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर', 'उरी', 'सिंबा' आणि '2.D' सारखे चित्रपट या साईटने लीक केले होते. मात्र, विकी कौशल आणि यामी गौतमने चाहत्यांना या चित्रपटाची पायरेटेड कॉपी पाहू नये, असा सल्ला दिला होता.
हा चित्रपट लीक झाल्यानं याचा परिणाम निश्चितच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होणार आहे. इम्रानच्या चीट इंडियाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केवळ १.७१ कोटींची कमाई केली होती. अशात चित्रपटाला लागलेल्या पायरसीच्या ग्रहणामुळे इम्रानच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे, हे नक्की.