कुछ कुछ होता है या चित्रपटात होती मोठी चूक, करण जोहरनेच केले मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 07:38 PM2019-08-20T19:38:31+5:302019-08-20T19:40:01+5:30
कुछ कुछ होता है या चित्रपटात एक मोठी चूक असल्याचे या चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरने नुकतेच कबूल केले आहे.
कुछ कुछ होता है या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका होत्या. तसेच सलमान खान देखील या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. विशेष म्हणजे करण जोहरने दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले होते. एवढेच नव्हे तर या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.
कुछ कुछ होता है या चित्रपटात एक मोठी चूक असल्याचे या चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरने नुकतेच कबूल केले आहे. मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सवात नुकतीच करणने हजेरी लावली होती. याच महोत्सवात करणने या चित्रपटात असलेल्या चुकीबद्दल मान्य केले. त्याने सांगितले की, या चित्रपटात एक मोठी चूक होती आणि त्याबाबत मला शबाना आझमी यांनी देखील सांगितले होते. हा चित्रपट नैतिकदृष्ट्या चुकीचा होता. हा चित्रपट शबाना आझमी यांनी यूकेमध्ये पाहिला होता. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी मला फोन केला होता. त्यावेळी त्या प्रचंड चिडलेल्या होत्या. त्यांनी मला चांगलेच सुनावले होते. त्या म्हणाल्या होत्या की, मुलीचे केस लहान असल्याने ती मुलगी चांगली दिसत नाही. पण केस वाढल्यानंतर ती अतिशय आकर्षक दिसते असे तू या चित्रपटात दाखवले आहेस हे अतिशय चुकीचे आहे. शबाना आझमी यांचे हे बोलणे ऐकल्यानंतर मी त्यांची लगेचच माफी मागितली. त्यावर त्यांनी तुला यावर काही बोलायचे नाही का असे विचारले. तर तुम्ही जे काही म्हणत आहात, ते योग्यच आहे असे मी त्यांना म्हणालो.
कुछ कुछ होता है या चित्रपटात काजोलने अंजली ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटासाठी काजोलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्राचा पुरस्कार देखील मिळाला होता. हीच अंजली टॉमबॉय असल्याचे दाखवण्यात आले होते. पण नंतरच्या काळात ती केस वाढवते असे आपल्याला पाहायला मिळाले होते.