आपले करियर वाचवण्यासाठी शाहरुख खान घेणार आमिर खानच्या आवडत्या दिग्दर्शकाची मदत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 14:12 IST2019-08-23T14:07:13+5:302019-08-23T14:12:06+5:30
झिरो या चित्रपटानंतर आता शाहरुख खानचा आगामी चित्रपट कधी येणार याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत.

आपले करियर वाचवण्यासाठी शाहरुख खान घेणार आमिर खानच्या आवडत्या दिग्दर्शकाची मदत?
आमिर खानचे थ्री इडियट, पीके हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या दोन्ही चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले होते. त्याचसोबत मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई यांसारखे हिट चित्रपट त्यांनी बॉक्स ऑफिसला दिले आहेत. आता शाहरुख त्याचे करियर वाचवण्यासाठी राजकुमार हिरानी यांची मदत घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
झिरो या चित्रपटानंतर आता शाहरुख खानचा आगामी चित्रपट कधी येणार याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. शाहरुखचा झिरो काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा त्याचा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर त्याने चित्रपटातून काही महिन्यांचा ब्रेक घेतला आहे. शाहरुख सध्या जास्तीत जास्त वेळ त्याच्या कुटुंबियांना देत आहे. शाहरुखने झिरोनंतर अद्याप कोणताच चित्रपट साईन केला नाही असे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.
शाहरुख आता राजकुमार हिरानीसोबत एका चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा आहे. या प्रोजेक्टबाबत अद्याप काहीही माहिती मिळाली नसली तरी शाहरुख आणि राजकुमार एका प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे. डेक्कन क्रोनिकलला दिलेल्या बातमीनुसार, शाहरुख खानला राजकुमार हिराणीच्या चित्रपटाची कथा आवडली असून त्याने चित्रपट देखील साईन केला आहे.
शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग खान म्हटले जाते. तो गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्याने गेल्या अनेक वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे, कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, चक दे इंडिया, कभी खुशी कभी गम, चेन्नई एक्सप्रेस यांसारख्या त्याच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. शाहरुखचा चित्रपट म्हटला की, तो हिटच होणार असे एकेकाळचे गणित होते. पण गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला झिरो हा त्याचा चित्रपट दणक्यात आपटला.