Shah Rukh Khan : एकच कल्ला होणार! KGF चे मेकर्स, शाहरुख खान अन् ‘कांतारा’चा रिषभ शेट्टी एकाच सिनेमात दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 11:10 AM2022-12-06T11:10:53+5:302022-12-06T11:11:37+5:30
Shah Rukh Khan : येत्या काळात शाहरूखचे ‘पठान’,‘जवान’ असे धमाकेदार सिनेमे पाहायला मिळणार आहेत. आता किंगखानच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे...
नव्या वर्षात शाहरूख खान (Shah Rukh Khan) ‘पठान’ या चित्रपटाद्वारे कमबॅक करतोय. पण ‘पठान’पेक्षाही त्याच्या ‘जवान’ या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळतेय. ‘जवान’ कधी एकदा येतो असं चाहत्यांना झालंय. या चित्रपटात शाहरूख साऊथचा दिग्गज दिग्दर्शक एटलीसोबत काम करतोय. किंगखान पॅन इंडिया फिल्म करतोय म्हटल्यावर चाहते क्रेझी झाले आहेत.
आता शाहरूखच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. होय, केजीएफ, केजीएफ 2 आणि कांतारा यासारखे सुपरडुपर हिट सिनेमे बनणाऱ्या होम्बाले फिल्म्स (Hombale Films) प्रॉडक्शनने आपल्या एका पॅन इंडिया प्रोजेक्टसाठी शाहरूखशी संपर्क साधल्याची माहिती आहे.
होम्बाले फिल्म्सचा ‘सालार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यात प्रभास लीड रोलमध्ये आहे. याशिवाय ज्युनिअर एनटीआरसोबतही होम्बाले फिल्म्सने एक सिनेमा साईन केला आहे. अशाच आणखी एका मोठ्या प्रोजेक्टसाठी होम्बालेने शाहरूखला पसंती दिली आहे. शाहरूखने या चित्रपटाला होकार दिलाच तर बॉक्स ऑफिसवर धमाका होणार, हे निश्चित.
या प्रोजेक्टबद्दलची आणखी एक खास बात म्हणजे, शाहरूखचा हा सिनेमा रोहित शेट्टी दिग्दर्शित करणार असल्याची चर्चा आहे. रोहित शेट्टी व शाहरूख या जोडीने याआधी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सारखा धमाकेदार हिट दिला होता. याशिवाय या प्रोजेक्टबद्दल आणखी एक इंटरेस्टिंग बातमी कानावर येतेय. होय, या चित्रपटात ‘कांतारा’ (Kantara ) फेम रिषभ शेट्टी (Rishab Shetty) हा सुद्धा कॅमिओ रोल करणार आहे. अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण सध्या या प्रोजेक्टची चर्चा जोरात आहे.
2023 या येऊ घातलेल्या वर्षात शाहरूखचं दमदार पुनरागमन होतंय. त्याचा ‘पठान’ हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होतोय. हिंदीसोबत हा सिनेमा तामिळ व तेलगूमध्येही रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, सिद्धार्थ आनंद यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात शाहरूख जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. यानंतर शाहरूखचा ‘जवान’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम अशा पाच भाषांमध्ये पाहता येणार आहे.