Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 17:23 IST2024-11-21T17:22:59+5:302024-11-21T17:23:44+5:30
Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देऊन ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे.

Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देऊन ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पोलिसांच्या तपासात असं समोर आलं आहे की, रायपूर येथून अटक करण्यात आलेला आरोपी वकील फैजान खान याने अभिनेता शाहरुख खानच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली लोकं आणि मुलगा आर्यन खान याच्याबाबत माहिती काढली होती.
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपीने ऑनलाईन सर्च करून शाहरुखची सुरक्षा आणि मुलगा आर्यन याबाबत बरीच माहिती गोळा केली होती. आरोपीकडे असलेला दुसरा मोबाईल फोन बारकाईने तपासला असता, त्याचा इंटरनेट हिस्ट्रीवरून हे समोर आलं आहे. आरोपीच्या मोबाईलमधून शाहरुखची सुरक्षा आणि मुलगा आर्यन याची ऑनलाइन सर्च हिस्ट्री सापडल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. ही माहिती का गोळा केली, असं आरोपीला विचारलं असता त्याने नीट उत्तर दिलं नाही.
वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने इंटरनेटवरून वांद्रे पोलीस स्टेशनचा लँडलाइन नंबर काढला होता आणि त्यानंतर त्याने धमकीचा कॉल केला होता. वांद्रे पोलिसांच्या तपासात असंही समोर आलं आहे की, आरोपीने शाहरुखला धमकावण्यासाठी जो मोबाईल वापरला होता तो मोबाईल आठवडाभरापूर्वी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी खरेदी केला होता आणि तो जुने सिमकार्ड वापरत होता. त्याने २ नोव्हेंबर रोजी मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली, परंतु मोबाईल नंबर बंद केला नाही.
वांद्रे पोलिसांच्या तपासानुसार, जर मोबाईल चोरीला गेला असता तर तो चोरणाऱ्याने सिम कॉर्ड बदलून दुसरे सिम लावले असते, मात्र या प्रकरणात असं काहीही झालेलं नाही, एवढेच नाही तर मोबाईल चोरीला गेल्यानंतर, आरोपीने त्यात बसवलेलं सिम कार्डवर फोन करून संपर्क करण्याचा, शोधण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही. आरोपीनेच गुन्ह्यात वापरलेला मोबाईल कोठेतरी लपवून ठेवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.