शाहरुखच्या 'डंकी'ला प्रभासच्या 'सालार'ने टाकलं मागे! ॲडव्हान्स बुकिंगमध्ये किंग खानच्या चित्रपटापेक्षा दुप्पट कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 10:04 AM2023-12-21T10:04:34+5:302023-12-21T10:05:01+5:30
प्रदर्शनाआधीच या सिनेमांनी ॲडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई केली आहे. पण, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये शाहरुखच्या 'डंकी'वर प्रभासचा 'सालार' भारी पडल्याचं दिसत आहे.
२०२३ वर्ष सरताना बॉक्स ऑफिसवर दोन 'डंकी' आणि 'सालार' हे दोन मोठे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. ख्रिसमसला चाहत्यांना शाहरुख खानचा 'डंकी' आणि प्रभासच्या सालारचं मोठं गिफ्ट मिळत आहे. या दोन्ही चित्रपटांसाठी चाहते उत्सुक असून या सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनाआधीच या सिनेमांनी ॲडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई केली आहे. पण, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये शाहरुखच्या 'डंकी'वर प्रभासचा 'सालार' भारी पडल्याचं दिसत आहे.
'डंकी' आणि 'सालार'च्या ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे समोर आले आहेत. यानुसार, प्रभासच्या सिनेमाने शाहरुखच्या चित्रपटाला मागे टाकल्याचं दिसत आहे. 'सालार' चित्रपटाने 'डंकी'पेक्षा ॲडव्हान बुकिंगमधून दुप्पट कमाई केली आहे. 'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमाची ५.६ लाख तिकिटे विकिली गेली आहेत. यातून या सिनेमाने १५.४१ कोटींची कमाई केली आहे.
तर दुसरीकडे प्रभासच्या 'सालार'ने ॲडव्हान्स बुकिंगमधून तब्बल २९.३५ कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाच्या आत्तापर्यंत १४ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. प्रभासचा 'सालार' तेलुगु, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या तेलुगु व्हर्जनने जवळपास २३.५ कोटींची कमाई केली आहे. तर हिंदी व्हर्जनने २.७ कोटींचा गल्ला जमवला आहे. मल्याळममध्ये १.६ कोटी, तमिळ व्हर्जनने १ कोटी आणि कन्नड सिनेमाने २५ लाख रुपयांची कमाई केली असून ॲडव्हान्स बुकिंगचा आणखी एक दिवस शिल्लक आहे.
शाहरुखचा 'डंकी' गुरुवारी (२१ डिसेंबर) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. तर 'सालार' शुक्रवारी (२२ डिसेंबर) चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये प्रभासचा चित्रपट 'डंकी'पेक्षा वरचढ ठरला आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.