Pooja Dadlani: शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी करतेय पोलिसांच्या कॉलकडे दुर्लक्ष; दुसऱ्यांदा समन्स पाठवणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 09:47 PM2021-11-10T21:47:28+5:302021-11-10T21:48:43+5:30
मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने समन्य बजावूनही पूजा ददलानी चौकशीसाठी हजर झाली नाही.
मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्ज केस (Mumbai Cruise Drugs Case) प्रकरणी शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. यानंतर आर्यन खान संबंधित ड्रग्ज प्रकरणात २५ कोटींच्या खंडणीच्या आरोपप्रकरणी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) हिची विशेष तपास पथकाकडून चौकशी होणार आहे. पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर पूजाने तब्येतीचे कारण पुढे करत वेळ मागितला होता. मात्र, आता पूजा ही पोलिसांच्या फोनलाही प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने समन्य बजावूनही पूजा ददलानी चौकशीसाठी हजर झाली नाही. तब्येत बरी नसल्याचे कारण तिने पुढे केले आहे. तरी काही गोष्टींची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी पूजाला तीन वेळा फोन केला होता. मात्र, पोलिसांच्या एकाही कॉलला पूजाने उत्तर दिले नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबई पोलीस पुन्हा समन्स बजावणार?
शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी या प्रकरणातील तपासासाठी महत्त्वाची दुवा असून, तिचे स्टेटमेंट मुंबई पोलिसांसाठी महत्त्वाचे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आताच्या घडीला पोलीस कायदेशीर प्रक्रिया आणि काही गोष्टींचा मागोवा घेत असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे म्हटले जात आहे. आगामी काही दिवसांत पूजा ददलानी हजर न झाल्यास मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा समन्स बजावले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, या कारवाईच्या रात्री लोअर परळ परिसरात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी ही वादग्रस्त पंच किरण गोसावी याला भेटल्यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. विशेष तपास पथकाकडून त्याची छाननी केली जात असून, लवकरच पूजाकडे याबाबत चौकशी करणार असल्याचे सांगण्यात जात आहे. सहाय्यक आयुक्त मिलिंद खेतले यांच्या नेतृत्वाखाली चारजणांची टीम तपास करत आहे. त्यांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, त्यामध्ये मुंबईच्या लोअर परळमध्ये पूजा ददलानीची कार दिसून आली आहे. याठिकाणी तिची गोसावी व सॅम डिसुझाबरोबर भेट झाली होती.