शाहरूख खानच्या सासूबाईं सापडल्या अडचणीत, भरावा लागणार इतक्या कोटींचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 11:08 AM2020-02-29T11:08:30+5:302020-02-29T11:10:04+5:30
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानच्या सासू सविता छिब्बर अडचणीत सापडल्या आहेत.
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानची सासू सविता छिब्बर अडचणीत सापडल्या आहेत. अलिबाग येथे असलेल्या त्यांच्या फार्म हाऊसला तीन कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. भाडेकरार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
शाहरूख खानची सासू आणि गौरी खानची आई सविता छिब्बर आणि बहिण नमिता छिब्बर या देजाऊ फार्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आहेत. अलिबागमध्ये छिब्बर मायलेकीच्या मालकीचा आलिशान फार्म हाऊस आहे. २००८ साली हे फार्म हाऊस बांधण्यात आले आहे.या हाऊसवर बॉलिवूडमधील अनेक पार्टी झाल्या आहेत. यामध्ये शाहरुख खानच्या ५२ व्या बर्थडे पार्टीचाही समावेश आहे. १.३ हेक्टरवर वसलेल्या या फार्महाऊसमध्ये स्विमिंग पूल आणि हेलिपॅडही आहे.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी 29 जानेवारी २०१८ रोजी छिब्बर यांच्या बंगल्याला नोटीस पाठवली होती. प्लॉट खरेदी केल्यानंतर रायगडच्या तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी १३ मे २००५ रोजी शेतीची परवानगी दिल्याचं नोटिशीत लिहिले होते.
प्लॉट खरेदी करताना मूळ जागेवर असलेलं फार्म हाऊस तोडून त्याजागी नवीन फार्महाऊस बांधण्यात आले होते. हे बॉम्बे टेनन्सी अॅक्ट म्हणजेच भाडेकरार कायद्याच्या कलम 63 चे उल्लंघन असल्याचे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार फार्म हाऊसच्या मालकांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर २० जानेवारी २०२० रोजी काढलेल्या ऑर्डरमध्ये ३ कोटी ९ लाख रुपयांचा दंड जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यासंदर्भात अद्याप शाहरूख खानकडून कोणतेही स्टेटमेंट आलेलं नाही. यापूर्वीदेखील अलिबागमधील शाहरुखचा बंगलाही अडचणीत आला होता. शाहरुखच्या अलिबागमधील फार्महाऊसला इन्कम टॅक्स विभागाच्या वतीने नोटीस जारी करण्यात आली होती.
शाहरूखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर बऱ्याच कालावधीपासून तो रुपेरी पडद्यापासून गायब आहे. सध्या तो पडद्याच्या मागे राहून कामे करत आहे. शेवटचा तो झिरो चित्रपटात झळकला होता.