बाहुबली प्रभासच्या 'सालार'पुढे शाहरुखची माघार; 'डंकी' ची रिलीज डेट पुढे ढकलली?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:18 PM2023-10-13T13:18:39+5:302023-10-13T13:23:48+5:30
शाहरुखने 'डंकी' ची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं आहे.
किंग खान शाहरुखचा 'पठाण'नंतर 'जवान' सिनेमा बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवतोय. अलीकडेच शाहरुखने त्याचा या वर्षातील तिसरा चित्रपट 'डंकी' जाहीर केला आहे. यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर 'डंकी' प्रदर्शित होणार असल्याची घोषणा शाहरुखने केली. एकाच वर्षात किंग खानचा तिसरा चित्रपट पाहायला मिळणार असल्याने चाहते खूप उत्साहित आहेत. तर दुसरीकडे प्रभासचा आगामी चित्रपट 'सालार - पार्ट 1 सीझफायर' देखील डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सालार आणि 'डंकी' यांच्यात काटे की टक्कर होणार होती. पण आता शाहरुखने 'डंकी' ची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं आहे.
Buzz: #SalaarVsDunki❌
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) October 12, 2023
#ShahRukhKhan's #Dunki likely to get POSTPONED.… pic.twitter.com/xWbDqHhioj
ट्रेड अॅनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी सोशल मीडियावर 'डंकी'ची रिलीज डेट पुढे ढकलल्याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, 'सालार आणि 'डंकी'मध्ये संघर्ष होत नाहीये. शाहरुख खानचा 'डंकी'पुढे ढकलला जाणार आहे. 'डंकी'ची डेट पुढे ढकल्यामागे प्रभासचा 'सालार' हा सिनेमा कारणीभुत असल्याच्या चर्चा आहेत. 'सालार' चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसादच्या पार्श्वभूमीवर 'डंकी'च्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याच बोललं जात आहे.
मात्र, अद्याप शाहरुख खान किंवा राजकुमार हिरानी यांच्याकडून अधिकृतरित्या या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याची घोषणा करण्यात आली नाही. मात्र, लवकरच ही घोषणा होऊ शकते, असेही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. शाहरुख आणि प्रभास दोन्ही मोठे सुपरस्टार्स आहेत. दोघांचाही चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर, परदेशातही पाहायला मिळतात.
प्रभास पुन्हा एकदा प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' चित्रपटात फुल अॅक्शन करताना दिसणार आहे. प्रभास आणि श्रुती हासन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग परदेशात सुरू झाले आहे. प्रभासचा 'आदिपुरुष' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली पण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात हा सिनेमा कमी पडला. त्यामुळे आता 'सालार' नक्की किती कमाई करतो याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.