Shahid kapoor :शाहिद कपूर कधीकाळी होता बॅकग्राउंड डान्सर, स्टारकिड्स असून सुद्धा चुकला नाही संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 01:48 PM2023-02-25T13:48:42+5:302023-02-25T13:54:54+5:30
स्टार किड असूनही, शाहिद कपूरला चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. या अभिनेत्याने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून केली होती.
शाहिद कपूर (Shahid Kapoor) चा आज बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांच्या यादीत समावेश होतो. या अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत 'जब वी मेट', 'कबीर सिंग' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आज अभिनेता त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहिद कपूरचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. चला तर मग, आज आम्ही तुम्हाला शाहिद कपूरच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित काही खास आणि इंटरेस्टींग गोष्टी सांगणार आहोत.
शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता पंकज कपूर आणि अभिनेत्री नीलिमा अझीम यांचा मुलगा आहे. शाहिद कपूर फक्त 3 वर्षांचा होता जेव्हा त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. नीलिमा अझीमपासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता पंकज कपूर मुंबईत आले. तर शाहिद कपूर त्याच्या आईसोबत दिल्लीत राहत होता.
शाहिद कपूरला करिअरच्या सुरुवातीला 'चॉकलेट बॉय' म्हटले जायचे. हा अभिनेता त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या लुक्स आणि डान्ससाठी देखील ओळखला जातो. पण शाहिद कपूरचा बॉलिवूडला प्रवास सोपा नव्हता. स्टार किड असूनही, शाहिद कपूरला चित्रपटांमध्ये स्वत: च बसस्थान बसवण्यासाठी बराच वेळ लागला. या अभिनेत्याने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून केली होती.
पहिलाच सिनेमा ठरला सुपरहिट
'ताल' आणि 'दिल तो पागल है' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये शाहिद बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसला आहे. दीर्घ संघर्षानंतर शाहिदला 2003 मध्ये 'इश्क विश्क' चित्रपटातून ब्रेक मिळाला. या चित्रपटात शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.
बॅक टू बॅक सिनेमे ठरले फ्लॉप
पहिल्याच चित्रपटाच्या यशानंतर शाहिद कपूरला अनेक चित्रपट मिळाले, पण त्यानंतर सगळे सिनेमे आपटले. शाहिद मागे-पुढे 'फिदा', 'दिवाने हुए पागल', 'वाह! 'लाइफ हो तो ऐसी' सारख्या चित्रपटात तो दिसला, पण हे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले.
'विवाह'ने दिलं जीवनदान
2006 मध्ये शाहिद कपूरला पुन्हा एकदा चित्रपट निर्माता सूरज बडजात्या यांच्या 'विवाह' चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला. त्यानंतर 2007 मध्ये रिलीज झालेल्या इम्तियाज अलीच्या 'जब वी मेट' या चित्रपटाने अभिनेत्याचे नशीब चमकावलं . शाहिद कपूरचा हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट रोमँटिक-कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. त्यानंतर शाहिद कपूरने आपल्या करिअरमध्ये मागे वळून पाहिले नाही.