‘300 मुलींसोबत सेक्स'चा डायलॉग चालतो; मग कबीर सिंग का नाही? शाहिद कपूरची सटकली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 02:38 PM2019-07-25T14:38:55+5:302019-07-25T14:39:48+5:30
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटावर टीकेची झोड उठली. विशेष म्हणजे, सिनेमा प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी ही टीका थांबली नाही. सुरुवातीला शाहिदने या टीकेकडे दुर्लक्ष केले. पण टीका थांबेना म्हटल्यावर मात्र त्याची सटकली.
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटावर टीकेची झोड उठली. चित्रपटातील हिरोचे आक्रमक सीन आणि डायलॉगवर प्रचंड टीका झाली. विशेष म्हणजे, सिनेमा प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी ही टीका थांबली नाही. सुरुवातीला शाहिदने या टीकेकडे दुर्लक्ष केले. पण टीका थांबेना म्हटल्यावर मात्र त्याची सटकली.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शाहिद यावर पहिल्यांदा बोलला. ‘कबीर सिंगची भूमिका नकारात्मक आहे, असे मला अजिबात वाटत नाही. उलट या भूमिकेला वेगवेगळे पैलू आहेत. कबीर सिंग महिलांसाठी किंवा मुलींचा राग करतो, असे नाही तर तर तो त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा भाग आहे. कबीर सिंग सारख्या व्यक्तिरेखा याआधीही अनेक सिनेमांत दिसल्या. पण या व्यक्तिरेखांवर कबीर सिंग इतकी टीका झाली नाही. ‘संजू’ या चित्रपटातील नायक मी 300 मुलींसोबत सेक्स केल्याचे बिनबोभाटपणे सांगतो. पण या डायलॉगबद्दल कुणी टीकेचा एक शब्दही काढला नाही, असे शाहिद उद्वेगाने म्हणाला.
तुला ‘संजू’च्या या डायलॉगवर आक्षेप आहे का? असे विचारले असता मात्र शाहिद सावध झाला. नाही, असे काहीही नाही. मला या चित्रपटावर काहीही आक्षेप नाही. मी तो चित्रपट एन्जॉय केला. कारण लोकांनी कसे वागावे यासाठी नाही तर एखाद पात्र कसे असते, यासाठी हा चित्रपट मी पाहिला होता, असे त्याने सांगितले.
का झाली टीका
महिलेवर हात उचलणारा, चाकूचा धाक दाखवून कपडे उतरवणारा, दारूच्या नशेत तर्र असणारा या चित्रपटातील सनकी हिरो अनेकांना भावला नाही. त्यामुळे अनेकांनी या चित्रपटावर आक्षेप नोंदवला होता. बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा आणि प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनीही या चित्रपटावर आक्षेप नोंदवलेला होता.‘मी कबीर सिंग हा सिनेमा पाहण्यास नकार देतेय. मी शाहिदची खूप मोठी चाहती आहे. पण स्टॉकिंग कुठल्याहीप्रकारे न्याय्य ठरवल्या जाऊ शकत नाही, ते स्वीकार्य नाही,’ असे ट्वीट शोभा डे यांनी केले होते.
बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा हिनेही शाहिदच्या या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. सोनाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना टॅग करत, या चित्रपटाला विरोध करणारे ट्वीट केले होते. ‘कुणाचेही या चित्रपटातील महिला विरोधी कथानकाकडे लक्ष गेले नाही? फक्त इंटेन्स अॅक्टिंग? हे खरोखरचं व्यथित करणारे आहे. तुम्ही तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आहात. भारतात महिलांच्या सद्यस्थितीबद्दल काय अपेक्षा कराव्यात, हेच मला कळत नाही,’असे ट्वीट तिने केले होते. भूमिका निवडण्यापूर्वी कलाकाराने आपल्या जबाबदारीचे भान ठेवायला नको का? असा संतप्त सवालही तिने केला होता.