पंकज कपूर यांना का दिला घटस्फोट? शाहिद कपूरची आई 36 वर्षांनंतर बोलली...!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 10:28 AM2020-05-19T10:28:58+5:302020-05-19T10:30:20+5:30
बॉलिवूडमध्ये बिघडलेल्या नात्यांच्या अनेक कथा आहेत. यापैकीच एक कथा म्हणजे, पंकज कपूर आणि नीलिमा अझीम.
बॉलिवूडमध्ये बिघडलेल्या नात्यांच्या अनेक कथा आहेत. यापैकीच एक कथा म्हणजे, पंकज कपूर आणि नीलिमा अझीम. नीलिमा अझीम म्हणजे बॉलिवूड स्टार शाहिद कपूरची आई. आजपासून 36 वर्षांपूर्वी नीलिमा व पंकज कपूर यांचे मार्ग वेगवेगळे झाले होते. दोघांचा घटस्फोट झाला. पंकज कपूर यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर पुढे नीलिमा यांनी दोन लग्न केलीत. पंकज कपूर यांनीही दुसरा संसार थाटला. या इतक्या वर्षांत पंकज कपूर यांच्यासोबतच्या नात्याबद्दल नीलिमा कधीच बोलल्या नाहीत. आता मात्र पहिल्यांदा त्यांनी मौन सोडत पंकज कपूर यांना घटस्फोट का दिला, ते सांगितले आहे.
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत नीलिमा यांनी सांगितले, ‘मला पंकज यांच्यापासून विभक्त व्हायचे नव्हते. पण ते त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेले होते. त्यांच्याकडे त्यांचे स्वत:चे एक कारण होते. आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी अवघ्या 15 वर्षांची होते आणि शाहिदच्या जन्मानंतर 3 वर्षांनी आम्ही वेगळे झालो होतो. विभक्त होण्यासाठी पंकजकडे चांगले कारण होते. मी त्यांना समजून घेण्याचा बराच प्रयत्नही केला. पण एक खरे आमचा घटस्फोट आम्हा दोघांसाठीही खूप कष्टाचा होता. आम्ही आतून पूर्णपणे तुटलो होतो. पण आज सर्वकाही ठिक आहे. ते त्यांच्या कुटुंबासोबत आनंदात आहेत. ते नेहमी आनंदात राहावे, हीच मी प्रार्थना करते.’
पुढे त्यांनी सांगितले, 3 वर्षांच्या शाहिदला घेऊन विभक्त होणे माझ्यासाठी अजिबात सोपे नव्हते. पण माझे मित्र आणि कुटुंबीयांच्या मदतीने मी त्यातून बाहेर पडले. अर्थात हे सर्व करताना मी काय काय भोगले, ते आठवूनही अंगावर शहारे येतात. पण मी यातून बाहेर पडू शकल. कारण त्यावेळी शाहिद माझ्यासोबत होता. तो नेहमीच माझी ताकद बनला. जसा काळ पुढे सरकत गेला तसा त्याने प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट केला.’
नीलिमापासून घटस्फोट झाल्यानंतर पंकज कपूर यांनी सुप्रिया पाठक यांच्याशी दुसरे लग्न केले. या दोघांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव रुहान कपूर तर मुलीच नाव सना कपूर आहे. नीलिमा यांनी सुद्धा यानंतर दोनदा संसार थाटला. 1991 मध्ये त्यांनी राजेश खट्टर यांच्याशी लग्न केले. अभिनेता इशान खट्टर हा त्यांचाच मुलगा. पण इशानच्या जन्मानंतर 2001 मध्ये हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर 2004 मध्ये नीलिमा यांनी रजा अली खान यांच्याशी लग्न केले. त्यांचे हे लग्न सुद्धा फार काळ टिकले नाही. 2009 मध्ये दोघेही वेगळे झाले.