सलग 3 चित्रपट फ्लॉप, डिप्रेशनमध्ये होता शाहीद; पण 'विवाह'नं सर्व काही बदललं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 06:00 PM2023-10-06T18:00:40+5:302023-10-06T18:03:40+5:30
सलग तीन चित्रपट फ्लॉप झाल्याने शाहिद डिप्रेशनमध्ये गेला होता, याचा खुलासा खुद्द शाहिदनेच केलायं.
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरनेबॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. बॅकग्राउंड डान्सर, सहाय्यक कलाकार अशा छोट्या-मोठ्या भूमिका ते बिग बजेट चित्रपटांचा नायकपर्यंतचा यशस्वी प्रवास शाहिदनं केला. त्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. पण शाहिदनं हार मानली नाही. एककाळ असा होता, जेव्हा सलग तीन चित्रपट फ्लॉप झाल्याने शाहिद डिप्रेशनमध्ये गेला होता. याचा खुलासा खुद्द शाहिदनेच केलायं.
शाहिद कपूरने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, ''शिखर', 'वाह! 'लाइफ हो तो ऐसी' आणि 'दिवाने हुए पागल' हे चित्रपट फ्लॉप झाले होते. मी डिप्रेशनमधून जात होतो, अगदी त्याच दिवसांत मी 8-10 दिवस विवाह चित्रपटातील लग्नाचं शूटिंग केलं. पण, यावेळी सूरज बडजात्या यांनी मला धीर दिला होता".
शाहिद कपूरने एक किस्साही शेअर केला. तो म्हणाला की, "एके दिवशी शुटिंगदरम्यान सूरज बडजात्या माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आले. माझ्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला कास्ट करायचे आहे का, असा प्रश्न मी त्यांना केला. त्यावर काय झालं? असं त्यांनी विचारलं. मी म्हणालो, मी एका महिन्यात तीन फ्लॉप चित्रपट दिलेत. ते कोणी पाहिले नाही. सुपरस्टार असलेल्या इतर कलाकारांचे चित्रपट हिट होत आहेत. त्यावर ते म्हणाले, तु तुझं काम करं आणि बाकी गोष्टींकडे लक्ष देऊ नको. इतर सर्व काही स्वतःहून येईल. तेव्हापासून मी नेहमी कामावरचं लक्ष देतो', असे शाहिदने सांगितलं.
दरम्यान, ‘विवाह’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट आजही प्रेक्षक तेवढ्याच आवडीने पाहतात. या चित्रपटात पुनम आणि प्रेमची जोडी चांगलीच गाजली होती. तर प्रेम ही भूमिका अभिनेता शाहिद कपूरने साकारलेली तर पुनमची भूमिका अभिनेत्री अमृता रावने साकारलेली. या चित्रपटातून शाहीद कपूरने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. आजही एक अभिनेता म्हणून त्यानं बॉलिवूडमध्ये आपली जागा पक्की केली आहे.