चॉकलेट बॉय'च्या इमेजवर शाहिद कपूर नाराज, म्हणाला, 'लोक टॅग देऊन मोकळे झाले, पण..'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 12:21 PM2024-02-01T12:21:49+5:302024-02-01T12:22:32+5:30
Shahid Kapoor: 'इश्क विश्क' या पहिल्याच सिनेमातून शाहिदला चॉकलेट बॉय हा नवा टॅग मिळाला. मात्र, शाहिदला तो बिल्कूल आवडला नव्हता.
बॉलिवूडचा चॉकेलट हिरो या नावाने लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शाहिद कपूर (Shahid Kapoor). जबरदस्त पर्सनालिटी आणि गुड लुकिंग यांच्या जोरावर शाहिदने तुफान लोकप्रियता मिळवली. खासकरुन तो तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय झाला. मात्र,त्याच्यावर लागलेला चॉकलेट बॉय हा टॅग त्याला बिल्कूल आवडला नाही. एका मुलाखतीमध्ये त्याने याविषयी भाष्य केलं आहे. आपली ओळख फक्त 'चॉकलेट बॉय'पूरती मर्यादित राहता कामा नये असं त्याने या मुलाखतीत सांगितलं.
शाहिद लवकरच 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे सध्या तो या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यावेळी त्याने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या डेब्यू फिल्मविषयी भाष्य केलं. पहिल्याच सिनेमात चॉकलेट बॉय हा मिळालेला टॅग त्याला अजिबात आवडला नव्हता असं त्याने सांगितलं.
२००३ साली शाहिदने 'इश्क विश्क' या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या सिनेमात अभिनेत्री भूमिका चावला हिने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. मात्र, शाहिद रातोरात लोकप्रिय झाला. त्यावेळी तरुणींमध्ये त्याची तुफान क्रेझ निर्माण झाली होती. त्यामुळे त्या चॉकलेट बॉय हा टॅग सुद्धा मिळाला. मात्र, तेव्हापासूनच मला ही ओळख पटलेली नव्हती. कलाकाराने एकाच साच्यात अडकून राहू नये, असं तो म्हणाला.
काय म्हणाला शाहिद?
"पहिल्या सिनेमाच्या वेळी मला चॉकलेट बॉय ठरवून लोक मोकळे झाले. पण, मला हा टॅग अजिबात आवडला नाही. कधीच नाही. तेव्हाही नाही आणि आताही नाही. मला एक कलाकार व्हायचं होतं. फक्त छान दिसणारा अभिनेता इतकीच माझी ओळख मला तयार करायची नव्हती", असं शाहिद म्हणाला.'
पुढे तो म्हणतो, "इश्क विश्क केल्यानंतर चॉकलेट बॉय हा शब्द माझ्या नावासोबत जोडला गेला. मला त्यावेळी फार वाईट वाटलं होतं. मी म्हटलं याचा नेमका अर्थ काय? चॉकलेट बॉय म्हणजे असतं काय? मी एक कलाकार आहे. मला व्यक्त व्हायला आवडतं. मला फक्त छान दिसायचं नाहीये. छान दिसणं, छान कपडे परिधान करणं ही फक्त वरची लेअर आहे. अभिनयाचा प्रवास हा खोलपर्यंत रुजला पाहिजे. मी तेव्हापासून स्वत:ला बदलायला सुरुवात केली. कारण, मला कायम क्लीन शेव करुन त्याच त्या एका पठडीतलं काम करायचं नव्हतं."
दरम्यान, शाहिद लवकरच तेरी बातों में ऐसा उलझा जिया या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तो पहिल्यांदाच अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. येत्या ९ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात जवळपास ३१ वर्षानंतर धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया स्क्रीन शेअर करणार आहेत.