शाहिद कपूरला कॅन्सर झाला असल्याची पसरली अफवा, कुटुंबियांनी दिले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 12:04 IST2018-12-08T11:56:04+5:302018-12-08T12:04:51+5:30
सोनालीनंतर आणखी एक अभिनेता कॅन्सर या आजाराने त्रस्त असल्याची बातमी एका वेबसाईटने दिली आहे. या वेबसाईटने बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध डान्सर अभिनेत्याला कॅन्सर झाला असल्याचे त्यांच्या बातमीत म्हटले आहे.

शाहिद कपूरला कॅन्सर झाला असल्याची पसरली अफवा, कुटुंबियांनी दिले स्पष्टीकरण
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सर या आजारावर गेल्या कित्येक दिवसांपासून अमेरिकेत उपचार घेत होती. ती नुकतीच भारतात परतली असून तिचे चाहते सध्या प्रचंड खूश आहे. पण आता सोनालीनंतर आणखी एक अभिनेता कॅन्सर या आजाराने त्रस्त असल्याची बातमी एका वेबसाईटने दिली आहे. या वेबसाईटने बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध डान्सर अभिनेत्याला कॅन्सर झाला असल्याचे त्यांच्या बातमीत म्हटले आहे. या वेबसाईटने कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नसल्याने हा अभिनेता शाहिद कपूर आहे अशी चर्चा रंगली होती. एवढेच नव्हे तर शाहिद गेल्या कित्येक दिवसांपासून या आजारावर उपचार घेत असून त्यासाठी तो सध्या मुंबईच्या बाहेर गेला असल्याचे देखील म्हटले जात होते. शाहिदच्या बाबतीत ही अफवा पसरल्यानंतर आता त्याच्या कुटुंबियांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
शाहिदच्या कुटुंबियांनी याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे की, शाहिदला कॅन्सर झाला ही केवळ एक अफवा असून अशाप्रकारच्या अफवा पसरवण्यात कोणाला आनंद मिळतो हेच आम्हाला कळत नाहीये. शाहिद एकदम ठिकठाक असून सध्या तो त्याच्या एका कामासाठी दिल्लीला गेला आहे. तो लवकरच मंबईला परतणार असून अशाप्रकारच्या अफवा पसरवू नयेत.
इरफान खान, सोनाली बेंद्रे हे कलाकार कॅन्सरवर उपचार घेत असून त्यांची दोघांचीही तब्येत चांगलीच सुधारत आहे. शाहिदच्या बाबतीत ही अफवा पसरवल्या गेल्यानंतर त्याचे चाहते तर चांगलेच भडकले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची अफवा ऋषी कपूर यांच्या बाबतीत देखील पसरवण्यात आली होती. ऋषी कपूर यांची तब्येत बरी नसल्याने ते अमेरिकेत उपचार घेत आहेत. अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी त्यांनीच सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आजारपणाविषयी त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते. पण ऋषी कपूर यांना नक्की काय झाले हे त्यांनी ट्वीट मध्ये सांगितले नसल्याने त्यांना कॅन्सर झाला असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. त्यावेळी ऋषी कपूर यांचे बंधू आणि अभिनेते रणधीर कपूर यांनी या केवळ अफवा असल्याचे मीडियाशी बोलताना सांगितले होते.