शाहिद कपूर झळकणार 'ह्या' साऊथ चित्रपटाच्या रिमेकमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 11:35 AM2018-08-01T11:35:28+5:302018-08-01T11:39:55+5:30
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला तेलगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी' सुपरहिट ठरला होता. याच चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक येत आहेत आणि आगामी काळात आणखीन साऊथचे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला तेलगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी' सुपरहिट ठरला होता. याच चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
शाहिदने नुकतेच 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले असून लवकरच तो या रिमेकच्या तयारीला लागणार आहे. येत्या 20 ऑगस्टपासून शाहिद 'अर्जुन रेड्डी' सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाच्या रिमेकसाठी शाहिदला लूकमध्ये बराच बदल करावा लागणार आहे. त्याला या व्यक्तिरेखेसाठी दाढी वाढवणे फार आवश्यक आहे आणि त्याला कुठल्याही नकली गोष्टींचा आधार घ्यायला आवडत नाही, म्हणून त्याला दाढी वाढविण्यासाठी वेळ मिळावा म्हणून चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या शेड्युलमध्ये बदल करण्यात आला आहे.
'अर्जुन रेड्डी' हा चित्रपट पुढील वर्षी 21 जून 2019 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे टी-सीरीजद्वारे सांगण्यात आले आहे. भूषण कुमार या सिनेमाची निर्मिती करत आहेत. टी- सीरीज आणि सिने वन स्टुडिओ यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. त्यांनी ही माहिती ट्विटरवर दिली आहे. तेलगूमध्ये सुपरहिट ठरलेल्या अर्जुन रेड्डी चित्रपटात आणि वेगळ्या लूकमध्ये शाहिदला पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.
शाहिद कपूरचा 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट 21 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग उत्तराखंडमध्ये करण्यात आले आहे. ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा वीज चोरीवर आधारित आहे. वीज कंपनीच्या पायऱ्या झिजवणाऱ्या सामान्य माणसाची कथा पाहायला मिळणार आहे. यात शाहिदसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.