शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 11:29 AM2024-11-16T11:29:09+5:302024-11-16T11:30:52+5:30
Ashwathama Movie : अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'अश्वत्थामा: द सागा कंटीन्यूज' थंडबस्त्यात गेला आहे.
अभिनेता शाहिद कपूर(Shahid Kapoor)चा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'अश्वत्थामा: द सागा कंटीन्यूज' (Ashwathama Movie) थंडबस्त्यात गेला आहे. चित्रपटाचे बजेट ५०० कोटींहून जास्त झाले होते त्यानंतर आता निर्मात्यांनी चित्रपटाचे काम थांबवले आहे. हा चित्रपट महान योद्धा अश्वत्थामा यांची महाकथा पडद्यावर आणणार होता, पण आता तो थांबवण्यात आला आहे.
'अश्वत्थामा: द सागा कंटिन्यूज' या पौराणिक ॲक्शनपटाची घोषणा यावर्षी मार्चमध्ये करण्यात आली. या चित्रपटात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नड चित्रपट दिग्दर्शक सचिन बी. रवी करत होते. मिड-डेच्या वृत्तानुसार, शाहिद कपूर स्टारर पौराणिक चित्रपट 'अश्वत्थामा: द सागा कंटिन्यूज'चे बजेट ५०० कोटींच्या वर पोहोचले होते.
बजेट वाढल्यामुळे थंडबस्त्यात गेला सिनेमा
'अश्वत्थामा: द सागा कंटिन्यूज' हा चित्रपट ॲमेझॉन स्टुडिओसह निर्माता वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवला जात होता. पण बजेट ५०० कोटींहून अधिक झाले आणि बजेटची कमतरता आणि लॉजिस्टिक आव्हानांमुळे चित्रपट थांबवण्यात आला. मिड डेच्या रिपोर्टनुसार, प्रॉडक्शन टीममधील एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, 'प्रोजेक्टचे प्रमाण खूप मोठे होते. आंतरराष्ट्रीय कल्पनारम्य-ॲक्शन चित्रपटांशी स्पर्धा करू शकेल असे काहीतरी बनवण्याची कल्पना होती. अश्वत्थाम्याचे चित्रीकरण अनेक देशांत होणार होते. पण आंतरराष्ट्रीय स्थळांवर शूटिंग बजेटमध्ये करणे हे कठीण असल्याचे जाणवले. पूजा एंटरटेनमेंटचे कर्ज हा आणखी एक मोठा घटक ठरला.
आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकले होते प्रॉडक्शन हाऊस
वासू भगनानी आणि त्यांचे प्रोडक्शन हाऊस पूजा एंटरटेनमेंट आधीपासूनच वादात आहेत. अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलेल्या कलाकारांची थकीत फी परत न केल्याचा आरोप निर्माता आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसवर आहे.