शाहरुख खान आहे सलमान खानपेक्षा दुप्पट श्रीमंत, त्याची मालमत्ता ऐकून तुम्हाला बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 09:00 PM2018-11-02T21:00:00+5:302018-11-02T21:00:00+5:30
सलमान आणि शाहरुख हे दोघेही तितकेच पॉप्युलर असले तरी सलमान आणि शाहरुखच्या मालमत्तेत दुप्पटीचा फरक आहे.
शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग खान मानले जाते. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. त्याच्या फौजी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. यामुळेच त्याला हेमा मालिनी यांनी दिल आशना है या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यानंतर त्याला दिवाना या चित्रपटाची ऑफर आली. त्याने दिल आशना है या चित्रपटाद्वारे त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी दिवाना हा चित्रपट आधी प्रदर्शित झाला असल्याने दिवाना त्याचा पहिला चित्रपट ठरला.
शाहरुख खान हा अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये आहे. आज बॉलिवूडमध्ये आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तीन खानांचाच दबदबा असल्याचे म्हटले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, सलमान आणि शाहरुख हे दोघेही तितकेच पॉप्युलर असले तरी सलमान आणि शाहरुखच्या मालमत्तेत दुप्पटीचा फरक आहे. आज बॉलिवूडमध्ये सलमान खान चित्रपटासाठी सर्वाधिक म्हणजेच ६० कोटी मानधन घेतो असे म्हटले जाते. असे असले तरी सेलिब्रिटी नेटवर्थनुसार, सलमान जवळ १९२४ कोटी इतकी मालमत्ता आहे तर शाहरुखजवळ ४४४० कोटी इतकी मालमत्ता आहे.
शाहरुख मुंबईतील वांद्रे येथील मन्नत या अलिशान बंगल्यात राहातो. यासोबत त्याच्याकडे आणखी दोन बंगले आणि एक शानदार फार्महाऊस आहे. या सगळ्याची किंमत ६५० कोटींहून अधिक आहे. शाहरुखचा मन्नत हा बंगला वांद्रे येथील बँड स्टँडला असून हा बंगला १९९५ ला त्याने केवळ १५ कोटीत खरेदी केला होता तर त्याचा लंडनमधील सेंट्रल सेंटर येथे एक बंगला आहे. तसेच दुबई मध्ये देखील त्याचा दुमजली भव्य बंगला असून या व्हिलामध्ये प्रायव्हेट बीच देखील आहे. यासोबतच शाहरुखकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.
शाहरुखला चित्रपटासोबतच जाहिरातींद्वारे प्रचंड पैसा मिळतो. तसेच तो अनेक पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचालन करतो. इव्हेंटमध्ये डान्स परफॉर्मन्स देखील देतो. शाहरुख कोलकाता नाइट रायडर या आयपीलमधील संघाचा मालक आहे. तसेच ड्रीम्स अनलिमिटेड आणि रेड चिलीज अशा दोन त्याच्या प्रोडक्शन कंपनी आहेत. एवढेच नव्हे तर शाहरुखचे अनेक रेस्टॉरंट देशात आणि देशाबाहेर आहेत.