Shahrukh Khan, Gauri Khan : मन्नत बंगला आणि तो महागडा सोफा...! अशी रातोरात इंटीरिअर डिझाइनर झाली गौरी खान...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 06:01 PM2023-04-21T18:01:46+5:302023-04-21T18:03:22+5:30
Shahrukh Khan, Gauri Khan : मन्नत बंगला खेरदी करून कंगाल झालेला शाहरुख...; गौरीच्या पुस्तकात झाला खुलासा
मुंबईतील अनेक दिग्गज कलाकारांच्या आलिशान बंगल्यांमध्ये ‘मन्नत’चा समावेश केला जातो. या बंगल्याला मुंबईतील आयकॉनिक प्लेस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. स्ट्रगल काळात किंग खान कित्येक वेळा या बंगल्याबाहेर उभा राहून स्वत:चे फोटो काढायचा. 1997 मध्ये ‘यस बॉस’ या चित्रपटावेळी शाहरुखने (Shahrukh Khan) पहिल्यांदाच ‘मन्नत’आतून पाहिला होता. त्याचवेळी आयुष्यात हा बंगला विकत घेणार असा निश्चय त्याने केला. आणि ते करुन सुद्धा दाखवलं. शाहरुखने ‘मन्नत’ची खरेदी करण्यापूर्वी नरिमन दुबास या गुजराती व्यवसायिकाचं हे घर होतं. मात्र, नरिमन यांनी हा बंगला शाहरुखला विकला. त्यावेळी शाहरुखने 13 कोटींमध्ये या घराची खरेदी केली होती. आज या बंगल्याची किंमत जवळपास 200 कोटी रुपयांच्या आसपास आहे. शाहरूख व गौरी खान (Gauri Khan) पहिल्यांदा आईबाबा बनणार होते, तेव्हा त्यांनी हा बंगला खरेदी केला होता. खरं तर तो बजेटच्या बाहेर होता. पण तरिही शाहरूखने तो खरेदी केला आणि यानंतर शाहरूखचा अख्खा बजेटच बिघडला. अवस्था ही की एक सोफा देखील खरेदी करताना त्याला विचार करावा लागला होता.
गौरीच्या पुस्तकात झाला खुलासा
गौरीचं 'माई लाइफ इन डिजाइन' हे कॉफी टेबल बुक प्रकाशित झालं आहे. याला शाहरूखने प्रस्तावना दिली आहे. यात शाहरूखने मन्नतच्या खरेदीवेळचा किस्सा सांगितला आहे. तो लिहितो, आम्ही मुंबईत आमचं पहिलं घर खरेदी केलं, तेव्हा आमच्या पहिल्या बाळाचा जन्म होणार होता. आम्ही घर खरेदी केलं. पण जेव्हा सोफा खरेदी करायला गेलो तेव्हा तो सोफा देखील खूपच महाग वाटला होता. साहजिकच आम्ही तो खरेदी करू शकलो नव्हतो. तेव्हा गौरीने त्या सोफ्याचं डीझाईन कागदावर रेखाटलं आणि लेदर खरेदी करून ते शिवून घेतलं. फक्त पैशाची कमतरता आणि तेव्हाची गरज म्हणून गौरीनं स्वतः घर डिझाईन करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे तेच तिचं पॅशन बनलं.