शक्ती कपूर यांच्यावरचं मोठं संकट टळलं; अपहरणाचा कट फसला, बिजनौर पोलिसांचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:20 IST2024-12-16T16:16:38+5:302024-12-16T16:20:25+5:30
सर्वत्र शक्ती कपूर यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

शक्ती कपूर यांच्यावरचं मोठं संकट टळलं; अपहरणाचा कट फसला, बिजनौर पोलिसांचा धक्कादायक खुलासा
विनोदी कलाकार सुनील पाल आणि मुश्ताक खान यांच्या अपहरणकर्त्यांच्या निशाण्यावर अभिनेते शक्ती कपूरसुद्धा होते. शक्ती कपूर यांचे अपहरण करण्याच्या विचारात अपहरणकर्ते होते. पण, त्याच्यावरील मोठे संकट टळले आणि ते थोडक्यात बचावले. ही माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे. आता सर्वत्र शक्ती कपूर यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
सेलिब्रिटींना कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलवायचे आणि त्यानंतर त्यांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसुली करणारी ही टोळी आहे. या टोळीच्या रडारवर शक्ती कपूरसुद्धा होते. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शक्ती कपूर यांंना 5 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण, 5 लाख रुपयांचा प्रस्ताव शक्ती कपूर यांनी अमान्य केल्याने हा कट फसला आणि शक्ती कपूर थोडक्यात बचावले. या टोळीचा अन्य सिनेतारकांच्या अपहरणात हात होता का, याचा तपास आता पोलिस करत आहेत.
अपहरण टोळीलीत आरोपी सार्थक चौधरी उर्फ रिकी याने पोलिस चौकशीत सांगितले की, "दुसरा मुख्य आरोपी लवी याने अपहरणाची योजना आखली होती. लवीच्या मते बदनामी झाल्यामुळे कलाकार पोलिसात तक्रार करत नाहीत. अभिनेते मुश्ताक खान यांचे अपहरण करून खंडणी वसूल केल्याप्रकरणी लवीने 10 जणांना सोबत घेतले होते. स्टार्सशी तो राहुल सैनी या नावाने बोलायचा". सध्या टोळीतील उर्वरित सदस्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या टोळीनं सुनील पाल, मुश्ताक, राजेश पुरी, अरुण बख्शी यांना आपल्या जाळ्यात फसवलं. अपहरणकर्त्यांनी सुनील पाल आणि मुश्ताक यांच्याकडून पैसे घेतले. तर अभिनेता राजेश पुरी याला बोलावून त्याच्यासोबत सेल्फी काढली सोडून दिले. सुनील आणि मुश्ताक यांच्या अपहरणानंतर कुटुंबीयांनी पोलिसांची मदत घेतली होती. इतकेच नाही तर अपहरणकर्त्यांनी अरुण बख्शी यांना दिल्लीत बोलावून त्यांच्याकडून पैसे घेतले व सोडून दिले होते.